नद्यांच्या पातळीत वाढ
By admin | Published: October 5, 2015 12:54 AM2015-10-05T00:54:53+5:302015-10-05T01:02:43+5:30
शिवारात पाणीच पाणी : चार दिवसांत जिल्ह्यात ४१३ मिलिमीटर पाऊस
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांत जिल्ह्णात ४१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दररोज पाऊस सुरू असल्याने खरीप काढणी खोळंबली असून, शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, गेल्या चार दिवसांत पंचगंगेच्या पातळीत चार फुटांनी वाढ झाली आहे. मान्सूनने पाठ फिरवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने थोडा दिलासा दिला आहे. खरीप पिके काढणीला आली आहेत. या पावसाने पिकांचे नुकसान होणार हे निश्चित असले तरी ऐन पावसाळ्यात जमिनीला पाझरच फुटला नसल्याने यंदा डिसेंबरनंतरच पाणीटंचाई भासणार आहे. त्यामुळे हा पाऊस पाणीटंचाई कमी करण्यासाठी पोषकच मानला जात आहे. गेले चार दिवस जिल्ह्णात दररोज पाऊस सुरू आहे. दुपारी एक-दीडनंतरच पावसाला सुरुवात होत आहे. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एक वाजता कोल्हापूर शहराला तब्बल तासभर जोरदार पावसाने झोडपले. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्णाला झोडपून काढले. परीख पुलाखाली बघताबघता दोन-अडीच फूट पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
गेल्या चार दिवसांत जिल्ह्णात ४१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात ६८ मिलिमीटर झाला आहे. पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी चार फुटांनी वाढली आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे.
कागल परिसरात पाऊस
कागल : कागल शहर आणि परिसरास शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह हा पाऊस सुरू झाला. तासभर कोसळल्यानंतरपावसाचा जोर कमी आला. मात्र, उशिरापर्यंत रीमझीम सुरू राहिली. दिवसभर हवामान कोंदट आणि ढगाळ राहिले.
कोडोलीत पाऊस
कोडोली : कोडोली व परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या परिसरात सोयाबीन, हायब्रीड व भुईमूग पिकांची काढणी चालू आहे. या पावसामुळे सध्या सुरू असलेल्या हायब्रीड, भुईमूग व सोयाबीनची सुगी चाललेल्या शेतकऱ्यांची मात्र धांदल उडाली.
रविवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मि.मी.मध्ये असा -
हातकणंगले -३.१२, शिरोळ -२.१४, पन्हाळा - ७, शाहूवाडी - २.५०, राधानगरी - १.८३, गगनबावडा - ७, करवीर - ५.४४, कागल - १५.७०, गडहिंग्लज - ४.७१, भुदरगड - निरंक, आजरा - १.५०, चंदगड - ०.३३
लक्ष्मीपुरी आठवडी
बाजार पाण्यात
लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारालाही पावसाचा तडाखा बसला. मुळात बाजार परिसरातील गटारी लहान असल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवरच येते. त्यात पाऊस जोेरात झाल्याने सर्व बाजारच पाण्यात गेल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली.