म्हैस खरेदी अनुदानासह दूध दरात वाढ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:11 AM2017-09-16T01:11:52+5:302017-09-16T01:12:43+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे दूध संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन कोटी ९० लाख लिटरनी वाढले असले तरी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे दूध संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन कोटी ९० लाख लिटरनी वाढले असले तरी म्हशीच्या दुधाची मागणी व उत्पादन यांमध्ये तफावत असल्याने उत्पादकांनी जास्तीत जास्त म्हैस दूध उत्पादनाकडे वळावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. म्हैस, दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी म्हैस दूध खरेदी दराबरोबरच वासरू संगोपन व म्हैस खरेदी अनुदानात वाढ करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. विषयपत्रिकेवरील संचालक मंडळाच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच महत्त्वपूर्ण विषय अवघ्या एका मिनिटात मंजूर करण्यात आले. संघाची उलाढाल दोन हजार कोटी झाली असून, वर्षभरात म्हशीच्या दुधाला सरासरी ४२ रुपये ६४ पैसे, तर गाईच्या दुधाला २६ रुपये ८४ पैसे दर दिला आहे. संघाने एकूण उत्पन्नातील ८१ रुपये ४२ पैसे शेतकºयांना परत केले आहेत. म्हैस व गाय दूध संकलनाचे प्रमाण सारखे झाले असून, पूर्ववत म्हैस दूध एकूण संकलनाच्या ७० टक्के करण्यासाठी उत्पादकांनी सहकार्य करावे. त्यासाठी आगामी काळात म्हैस खरेदी व वासरू संगोपन अनुदानात वाढ करण्याबरोबरच म्हैस दूध खरेदी दरातही वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
शेअर्स भांडवल व ९२ कोटींचा दूध फरक परत देणारा ‘गोकुळ’सारखा देशात दुसरा संघ नसल्याचे सांगत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, अर्ध्या तासात पशुवैद्यकीय सेवा दारात पोहोच करण्याची किमया केवळ ‘गोकुळ’च करू शकतो. शेतकºयांच्या जीवनात खºया अर्थाने क्रांती आणण्याचे काम संघाने केले असून, यापुढील काळातही असे काम ताकदीने करावे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचेही भाषण झाले. ‘गोकुळश्री’ व गुणवंत कामगारांचा रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संस्थांच्या वतीने अध्यक्षांचा सत्कार
‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात मिळविलेल्या विविध पुरस्कार व सर्वाधिक दूध फरकाबद्दल विविध संस्थांच्या वतीने अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला; ूतर महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
मोठा पोलीस बंदोबस्त
संघाच्या गतसभेचे अनुभव पाहता, या वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलीस उपअधीक्षक
डॉ. प्रशांत अमृतकर व करवीरचे उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली जलद कृती दलाच्या तुकड्यांसह पोलीस कुमक तैनात होती.
मिनिटात ११ विषय मंजूर
‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या ४० मिनिटांत आटोपली. विषयपत्रिकेवरील महत्त्वपूर्ण अकरा विषय तर मिनिटात मंजूर झाले. संघाचे नेते महादेवराव महाडिक यांनी हातात अहवाल धरून मंजुरीची आरोळी दिल्यानंतर ‘मंजूर... मंजूर’ म्हणून घोषणा देण्यात आल्या व सभाच गुंडाळण्यात आली.