नगराध्यक्षांच्या बंडाच्या व्याप्तीत वाढ

By admin | Published: January 7, 2015 11:43 PM2015-01-07T23:43:46+5:302015-01-07T23:51:18+5:30

इचलकरंजीचे राजकारण : दोन्ही काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये अस्वस्थता; कॉँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक ‘शविआ’च्या संपर्कात

Increase in the number of municipal rebels | नगराध्यक्षांच्या बंडाच्या व्याप्तीत वाढ

नगराध्यक्षांच्या बंडाच्या व्याप्तीत वाढ

Next

इचलकरंजी : येथील नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडाची व्याप्ती वाढू लागली असून, कॉँग्रेसमधील नऊ नगरसेवक व राष्ट्रवादीतील दोन नगरसेवक फुटीरतेच्या उंबरठ्यावर असल्याने दोन्ही कॉँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. दरम्यान, शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, ‘शविआ’चे सर्व प्रमुख व दोन्ही कॉँग्रेसचे मोजकेच नगरसेवक उपस्थित राहिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्षा बिरंजे यांनी सोमवारी (दि. ५) राजीनामा देण्यास ठाम नकार दिला. त्यावेळी शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक व कारंडे गटाचे चार नगरसेवक यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे शहर कॉँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. त्यापाठोपाठ येथील जय सांगली नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये आमदार हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर विकास आघाडीची बैठक झाली. बैठकीस सागर चाळके, बादशहा बागवान, अजित जाधव, जयवंतराव लायकर, अशोक स्वामी, तानाजी पोवार, महादेव गौड, सुनील महाजन, राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे, नगराध्यक्षा बिरंजे, त्यांचे पती श्रीकांत बिरंजे, पांडुरंग बिरंजे, कॉँग्रेसचे नगरसेवक संजय तेलनाडे, चंद्रकांत शेळके, आदी उपस्थित होते.
काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा, आयजीएम हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू करणे, यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून विकासकामे करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला.
नगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा इच्छा असूनही देता येत नाहीत. याबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या बंडामुळे नगरपालिका कामकाजावर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह करण्यात आला. (प्रतिनिधी)

चुकीच्या सल्ल्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडून खरडपट्टी
नगराध्यक्षांच्या बंडाबाबत नेमकी माहिती नसल्यामुळे पालिकेतील एका प्रमुखाने दिलेला सल्ला चुकीचा ठरला. उलट त्यामुळे नगराध्यक्षांच्या बंडाची व्याप्ती वाढली. पालिकेतील त्या प्रमुखाची कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी खरडपट्टी काढली. पक्षप्रमुख असूनही त्याचा नगरसेवकांशी ‘प्रॉपर’ संपर्क नाही. नगरसेवकांची नस माहीत नसल्याने दैनंदिन कामकाजातसुद्धा गोंधळ उडत असल्याने पक्षश्रेष्ठी त्याच्यावर भडकले होते.
नगराध्यक्षांच्या कार्यालयाचा ‘शविआ’कडून ताबा
नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष कार्यालयात सातत्याने बसणाऱ्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची आज, बुधवारी नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये वर्दळ वाढली होती. सागर चाळके, सुनील महाजन यांच्यासारखे ‘शविआ’तील प्रमुख मंडळींनी नगराध्यक्षांच्या अ‍ॅँटी चेंबरमध्ये ठाण मांडले होते. ‘शविआ’च्या नगरसेवकांचा राबता पाहता कॉँग्रेसचेच नगरसेवक नगराध्यक्षांच्या कार्यालयाकडे फिरकले नाहीत.

Web Title: Increase in the number of municipal rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.