कांद्याच्या दरात क्विंटलमागे दीड हजारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:27+5:302021-01-02T04:21:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेतल्याने बाजारात कांद्याच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेतल्याने बाजारात कांद्याच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठ दिवसात क्विंटलमागे दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारात कांद्याचा कमाल दर ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
खरीप कांद्याला अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादन काहीसे कमी झाले होते. तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक बऱ्यापैकी आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, पंजाब येथेही कांद्याचे पीक चांगले आल्याने मध्यंतरी दर घसरले होते. त्यातच केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून आंदोलन केले होते. कवडीमोल दराने कांदा विकावा लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. शेतकरी संघटनेने निर्यात धोरणावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवली. त्यामुळे दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. आठ दिवसांपूर्वी कांद्याचा किमान दर प्रति क्विंटल ८०० रुपये, तर कमाल २,५०० रुपये होता. त्यात वाढ होऊन किमान दर १,५०० रुपये व कमाल दर चार हजार रुपये झाला आहे.
कोट-
निर्यातबंदी उठविल्याने कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. मात्र, निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला नव्हता. त्यामुळे पुढील आठवड्यात कांदा बाहेर आल्यानंतर थोडे दर कमी होतील.
- मनोहर चूग (अध्यक्ष, कांदा-बटाटा असोसिएशन)
असे वाढले कांद्याचे दर, क्विंटलला -
तारीख आवक पिशव्या किमान दर कमाल दर सरासरी दर
१९ डिसेंबर ८६३२ ८०० २५०० १८००
२८ डिसेंबर ६६३६ १२०० ३१०० २३००
१ जानेवारी २५२२ १५०० ४००० २८००