दुभत्या जनावरांच्या किमतीत भरमसाठ वाढ
By admin | Published: June 8, 2015 12:15 AM2015-06-08T00:15:08+5:302015-06-08T00:54:14+5:30
शेतकरी चिंतेत : दुधाला मिळेना उत्पादन खर्चावर आधारित भाव
संजय पाटील -देवाळे -ग्रामीण भागात शेती व्यवसायाबरोबरच विविध शेतीपूरक व्यवसाय केले जातात. शेतीला संलग्न असलेला दूध व्यवसाय मात्र आता मोठ्या अडचणीत येताना दिसत आहे. एका बाजूला दुभत्या जनावरांच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ व त्या प्रमाणात दुधाला न मिळणारा भाव, यामुळे खर्चाच्या तुलनेत नफा अगदी अल्प असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
दूधपंढरी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. अस्सल व जातिवंत जनावरे पाळण्याचा व त्यांचे संगोपन करण्यासाठी येथील शेतकरी प्रसिद्ध आहे. मात्र, दुभत्या जनावरांसाठी लागणारे पशुखाद्याचे वाढलेले दर, वाळल्या चाऱ्याला आलेला सोन्याचा भाव व त्या प्रमाणात दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.
करवीर तालुक्यातील कोपार्डे, तर हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावचा म्हैस, गाय व बैल बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मात्र, गत बाजार अत्यंत कडक होता. दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमतीमुळे खरेदी-विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याचे व्यापारी समितीकडून सांगण्यात आले. दूध संस्था, पतसंस्थांकडून कर्जे काढून दुभती जनावरे खरेदी करून त्याचे व्याज व परतफेड करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही. त्याचा परिपाक जनावरे पाळण्याच्या संख्येत घट होत आहे.
सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आठवडा बाजारातून सामान्य शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे मिळतील याची खात्री नाही. बऱ्याचदा व्यापारी व दलालांकडून गाय, म्हैस, बैल खरेदीत फसवणुकीचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ, दूध संस्थांमधील फॅट दरात होणारा सावळा-गोंधळ, दूध संस्थांतील गैरव्यवहार या साऱ्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
दराअभावी दूध उत्पादनात घट
दुभत्या जनावरांच्या वाढत जाणाऱ्या किमतीमुळे व पतपेढ्यांमधील आर्थिक उचलीमुळे शेतकरी जनावरे कमी करीत आहेत. त्यातच दुधाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही. जनावरांच्या संख्येत घट झाल्यामुळे दूध उत्पादन घटू लागले आहे, असे जयनंदा पाटील यांनी सांगितले.
म्हशींच्या दरात वाढ
म्हशींच्या खरेदी दरात सुमारे ४५ ते ५५ हजारांपर्यंत वाढ झाली. दुभत्या जनावरांमध्ये पंढरपुरी म्हैस (५५ ते ७५ हजार), मुऱ्हा म्हैस (४० ते ५० हजार), गवळाट म्हैस (३० ते ४० हजार), तर जर्सी गाय (२५ ते ४० हजार) असे भाव वाढले आहेत.