ऊस वाहतुकीच्या दरात वाढ करा, ऊस तोडणी व वाहतूक संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 06:51 PM2020-09-29T18:51:13+5:302020-09-29T18:52:19+5:30
ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ करावी, चालक व मालकांना कोविड विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली.
कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ करावी, चालक व मालकांना कोविड विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली.
राज्य ऊस तोडणी, वाहतूक कामगार व वाहनधारक हे आठ लाख आहेत. साखरउद्योगातील सर्वांत तळांतील घटक आज उपेक्षित राहिला आहे. अनेक जाचक अटींचे बळी वाहनधारक पडत आहेत. वास्तविक ऊसतोडणी मजूर आणण्याची जबाबदारी ही साखर कारखान्यांची असताना ती वाहनधारकांवर लादली आहे. त्यातून वाहनधारकांची फसवणूक होते. अशा परिस्थितीत काम करणे अवघड बनले आहे.
यासाठी त्यांच्या वाहतूक दरात वाढ करावी, त्यांना कोविड विमा कवच द्यावे, वाहतूकदार व चालक, मालक यांना प्रत्येकी पाच लाखांचा अपघात विमा लागू करावा व त्याच्या हप्त्यांची रक्कम सरकार व कारखान्यांनी भरावी. कारखाना कार्यस्थळावर स्वच्छ पिण्याचे पाणी, जेवण व विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
कारखान्यांनी बसपाळीचा भत्ता द्यावा. या मागण्याचे निवेदन प्रादेशिक साखर सहचालकांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. सुभाष जाधव, उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगले, आनंदा डाफळे, विठ्ठल कांबळे, रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.