बाजार समितीच्या उत्पन्नात दीड कोटीची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:21+5:302021-09-27T04:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय मंडळ आल्यापासून काटकसरीचा कारभार करत उत्पन्न वाढीकडे लक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय मंडळ आल्यापासून काटकसरीचा कारभार करत उत्पन्न वाढीकडे लक्ष दिल्यानेच, गतवर्षीच्या तुलनेत २०२०-२१ या आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ६० लाखाने उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली. नियोजनबध्द कामकाजामुळे पाच कोटीच्या ठेवी ठेवू शकल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी वसविलेल्या या बाजारपेठेत शेतकऱ्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. सौरऊर्जा प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर असून बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी पेट्रोल पंप लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रशासकीय मंडळ आल्यापासून व्यापाऱ्यांचे दप्तर तपासणीचे काम हाती घेतल्याने समितीच्या उत्पन्नात भर पडली. शाहू संस्कृतिक हाॅलचा कारारही लवकरच संपणार असून आवश्यक त्या दर्जेदार सुविधा निर्माण करून समिती आपल्या व्यवस्थापनेखाली सांस्कृतिक हाॅलचे काम पाहणार आहे.
समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विकास संस्था, ग्रामपंचायत, अडते, व्यापारी आदींनी ऑनलाईन सहभाग घेतला. अशासकीय मंडळाचे सदस्य, उपसचिव, समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळातही उत्पन्नात वाढ
गेली दोन वर्षे कोरोना कालावधीत सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले होते. अशा अडचणीच्या काळातही बाजार समितीचे कामकाज सुरळीत ठेवून समितीला २०२०-२१ या आर्थिक वर्षात १६ कोटी १४ लाख ५७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
फोटो ओळी :
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सचिव जयवंत पाटील होते.
(फाेटो-२६०९२०२१-कोल-बाजार समिती)