आरटीपीसीआर तपासण्या वाढवा : हर्षला वेदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:07+5:302021-07-07T04:29:07+5:30
कुरुंदवाड : शहरातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक यांनी शहराला भेट ...
कुरुंदवाड : शहरातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक यांनी शहराला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पालिका मुख्याधिकारी कक्षात पालिका प्रशासन आणि जि. प. आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संसर्ग नियंत्रणात राखण्यासाठी पालिका प्रशासनाने केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत स्वॅब (आरटीपीसीआर) तपासणी वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना, संस्थात्मक अलगीकरण कक्ष, कंटेनमेंट झोनबाबत योग्यवेळी घेतलेले निर्णय, अँटिजन, आरटीपीसीआर तपासणीसाठी ठिकठिकाणी राबविण्यात आलेली मोहीम, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या याची माहिती दिली. मुख्याधिकारी जाधव यांनी शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने शहरातील साथ आटोक्यात असल्याचे स्पष्ट करुन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा तराळ, पालिका प्रशासन अधिकारी पूजा पाटील, कर निरीक्षक प्राची पाटील, आरोग्य सेवक अमर घोलप उपस्थित होते.
दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर आस्थापना शासन आदेश येईपर्यंत सुरु करु नयेत. सर्वच आस्थापनाधारकांनी आरटीपीसीआर तपासणी करुन घेतल्याशिवाय आस्थापना सुरु करु नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी जाधव यांनी शहरातील आस्थापनाधारकांना दिले आहेत.