सन्मती बँकेच्या भागभांडवल व ठेवींमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:05+5:302020-12-27T04:18:05+5:30
आर्थिक वर्षात २ कोटी ५४ लाख रुपयांचा ढोबळ नफा इचलकरंजी : अडचणीच्या काळातही सन्मती बँकेच्या भागभांडवल व ठेवींमध्ये प्रचंड ...
आर्थिक वर्षात २ कोटी ५४ लाख रुपयांचा ढोबळ नफा
इचलकरंजी : अडचणीच्या काळातही सन्मती बँकेच्या भागभांडवल व ठेवींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बँकेला आर्थिक वर्षात २ कोटी ५४ लाख रुपयांचा ढोबळ, तर १ कोटी ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
सन्मती सहकारी मल्टिस्टेट को-ऑप. बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करत प्रधान कार्यालयासह शाखांमधील सदस्य ऑनलाईन सभेत सहभागी झाले होते. पाटील म्हणाले, मागील आर्थिक वर्षात उद्योगधंद्यामध्ये झालेली घट आणि वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कोविड महामारीमुळे बँकिंग क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. या काळात बँकेच्या सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बँकेची यशाची घोडदौड कायम राहिली. कोरोनामुळे वसुलीवर मोठा परिणाम जाणवला. सन २०२०-२१ सालासाठी विकास योजना आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत व्यवसाय वृद्धीसाठी कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, धारवाड जिल्हा कार्यक्षेत्र समाविष्ट करण्यात येणार आहे, तर शहर व परिसरात आवश्यक ठिकाणी ऑफसाईट एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शविली. याप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाशराव सातपुते, विश्वनाथ अग्रवाल, गजानन होगाडे, बाळासाहेब कलागते, अशोकराव सौंदत्तीकर, भूषण शहा, बँकेचे संचालक, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अजित कोईक यांनी आभार मानले.
फोटो ओळी - इचलकरंजीत सन्मती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सुनील पाटील यांनी माहिती दिली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, बॅकेचे मॅनेजर अशोक पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष अजित कोईक, महादेव कांबळे, आदी उपस्थित होते.