लसीकरणाबरोबरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:36+5:302021-03-31T04:25:36+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाबरोबरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा, रुग्णांना ...
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाबरोबरच ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवा, रुग्णांना त्वरित ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी शासकीय व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिल्या. खासगी रुग्णालयातील खाटांचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आतापासून करावे. खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी लेखा परीक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येणाऱ्या काळात धोका टाळण्यासाठी पुन्हा सर्वांनी काळजी घ्यावी. आपल्या जिल्ह्यातही रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. मागील वर्षी उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता आता सर्वांनी सतर्क व दक्ष राहून त्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे त्या तालुक्यात रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी रुग्णामागे २० ते ३० लोकांचे ट्रेसिंग करावे. नोडल अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरून हॉटस्पॉटची यादी पाठविण्यात येते. त्यानुसार त्या भागाचा सर्व्हे करून त्या ठिकाणी उपाययोजना राबविण्यात याव्यात.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, गतवर्षीप्रमाणेच ग्राम समित्या सक्रिय व्हाव्यात व गृहअलगीकरणात असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्याबरोबर लसीकरणासाठीही नियोजन करावे.
कोविड काळजी केंद्र कार्यान्वित करा
तालुकास्तरावर कोविड काळजी केंद्र कार्यान्वित करून प्रत्येक केंद्रात १०० रुग्णांची सोय करण्याचे नियोजन नोडल अधिकारी, तहसीलदार व यंत्रणेने करावे. आयसोलेशन सेंटर गाव पातळीवर सुरू करावे व लक्षणे नसलेल्या रुग्णांची गावातील केंद्रात सोय करावी. ग्राम समित्यांनी पुन्हा सक्रिय होऊन ट्रेसिंगसाठी पुढाकार घ्यावा. हॉटस्पॉट क्षेत्रातील सर्व लोकांची तपासणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लसीकरणासाठी ३७० केंद्रे
जिल्हाधिकारी म्हणाले, यापूर्वी ६० वर्षांवरील व व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात १५० लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. आता ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने आणखी २२०, अशी ३७० लसीकरण केंद्रे कार्यानिव्त राहणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रनिहाय नियोजन करून नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे.
पहिल्या व दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र व्यवस्था करा
लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तीसाठी, तसेच दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतंत्र दोन काउंटर सुरू करावेत. पहिला डोस ज्या कंपनीच्या लसीचा दिला आहे, त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस नागरिकांना दिला जाईल यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदी ठेवून त्याप्रमाणे डोस द्यावा. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.
--
फोटो नं ३००३२०२१-कोल-कोरोना आढावा
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी डॉ. अनिल माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.