लहान मुलांमध्ये वाढल्या दाताच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:48+5:302021-08-28T04:26:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चॉकलेट अहाहा.. नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं. हा पदार्थ म्हणजे बच्चे कंपनीसाठी जीव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चॉकलेट अहाहा.. नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं. हा पदार्थ म्हणजे बच्चे कंपनीसाठी जीव की प्राण. पण हेच चाॅकलेच लहान मुलांमधील दाताच्या समस्येचे कारण बनत आहे. यातील शर्करा दाताला चिकटून बसल्याने लहानपणीच दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच मुलांचे दात लवकर किडू द्यायचे नसतील तर चॉकलेट खाणे टाळा असा सल्ला डॉक्टर देतात.
चॉकलेट न आवडणारा व्यक्ती तसा दुर्मिळच. अगदी डेअरी मिल्क पासून डार्क फॅन्टसी सारख्या महागड्या चॉकलेटची भुरळ सगळ्यांवर असते. त्यात चॉकलेट केक. चाॅकलेट आईस्क्रीम, चॉकलेट बिस्कीट अशा वेगवेगळ्या प्रकारांनी जिभेचे चोचले न पुरवले तर नवलच. चॉकलेट खाण्याची सवय मोठ्या माणसांकडून लहान मुलांना लागते. मुलांना हा पदार्थ आवडतो म्हणून मोठी माणसं ती देतात आणि पालक देतात म्हणून मुलं खातात असे हे चक्र आहे. पण मुलांच्या हाती चॉकलेट देताना आपण दाताच्या समस्यांना निमंत्रण देत नाही याची खबरदारी पालकांनी देखील घ्यायला हवी. या पदार्थामधील शर्करा दात किडण्याचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे चॉकलेट खाताना दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.
----
लहानपणीच दातांना कीड
दहा मुलांपैकी किमान दोन मुलांना दात किडण्याच्या समस्येने ग्रासले आहे. त्यात दुधाचे दात किडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे दात पडणारच आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, हे दात किडून नव्हे तर नैसर्गिकपणे पडणे महत्त्वाचे आहे. या काळात मुलांची वाढ होत असल्याने त्याप्रमाणे दात जबड्याची ही धाटणी ठरते. दुधाचे दात हे नवीन दात येण्यासाठी जागा धरून ठेवण्याचे काम करतात. ते लवकर पडले की नंतर दात वाकडे तिकडे येतात. त्यामुळे दुधाच्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.
---
अशी घ्या दातांची काळजी
-रोज रात्री न चुकता ब्रश करा.
-सकाळचा चहा, नाष्टा किंवा जेवण झाल्यानंतर ब्रश करा.
-बाळ लहान असेल तर सुती कापडाने दात घासा
- काहीही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरा.
- ब्रश दातांवर आडवा न फिरवता वरखाली या उभ्या पद्धतीने फिरवत घासा.
-दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
---
चॉकलेट न खाल्लेलाच बरा
चाॅकलेटमध्ये शर्कराचे प्रमाण अधिक असल्याने ते खाल्ल्यावर त्याचा थर दातांवर चिकटतो. तो बराच काळ तसाच राहिल्याने जंतू तयार होऊन दात किडतात. त्यामुळे चॉकलेट काय कोणताही गोड तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे गरजेचे आहे. असे केल्याने दातांवरचा थर निघून जातो.
----
चॉकलेटमध्ये असलेल्या शर्करामुळे दात किडतात. रात्री झोपताना ब्रश करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आधी स्वत: ही सवय लागून घ्यावी म्हणजे लहान मुलांनाही ती लागेल. मग सकाळी उठल्यावर चूळ भरली तरी चालेल. नाष्टा, जेवण झाल्यावर ब्रश करणे ही योग्य पद्धत आहे. वारंवार खात राहणे देखील दातांसाठी हानिकारक आहे.
डॉ. चैतन्य शिपूरकर (दंतरोग तज्ज्ञ)
---