वनातील मानवाचा वाढता हस्तक्षेप संघर्षाचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:39+5:302021-01-09T04:19:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या गरजा व त्यांची जीवनशैली समजून घेतली, तर नक्कीच हा संघर्ष कमी होऊ शकतो. जंगले व वनसंपदा भविष्यासाठी सुरक्षित ठेवायची असतील तर वन व्यवस्थापनाची संकल्पना समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचणे गरजचे आहे. या कामात तरुण पिढी प्रभावी भूमिका बजावू शकते” असे प्रतिपादन पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील यांनी येथे व्यक्त केले.
कर्मवीर हिरे महाविद्यालयात नववर्षारंभानिमित्त आयोजित ''''वनव्यवस्थापन व भारतीय वनविभागातील नोकरीच्या संधी'''' या विषयावरील कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील होते.
दत्तात्रय पाटील म्हणाले, “जंगले म्हणजे केवळ मौजमजा व नशाबाजी करण्याची ठिकाणे आहेत, अशी मनोवृत्ती सध्या वाढत आहे. जंगली प्राण्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे बदलल्या जात आहेत. त्याचा फटका जंगल व पर्यायाने निसर्गाला बसतो आहे. याला आपण वेळीच आवर घातला नाही, तर मानव- वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र होणार यात शंका नाही.
यावेळी दत्तात्रय पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व भारतीय वन विभागातील विविध पदे व त्यांची भरती प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ. शरदराव व्हनाळकर, डॉ. संताजी खोपडे, प्रा. उत्तम चौगले, सौ. रेश्मा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एस्सी. विभागप्रमुख डॉ. सागर व्हनाळकर यांनी केले. स्वागत डॉ. विलास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मृणाल देसाई यांनी केले. आभार प्रा. चेतन भगत यांनी मानले.
फोटो ओळ: कर्मवीर हिरे महाविद्यालयात आयोजित ''''वनव्यवस्थापन'''' कार्यक्रमात बोलताना वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील. यावेळी उपस्थित (डावीकडून) डॉ. सागर व्हनाळकर, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, सौ. रेश्मा पाटील, डॉ. मृणाल देसाई व डॉ. शरदराव व्हनाळकर.