CoronaVirus Lockdown : वाढलेल्या लॉकडाऊनने चेहरे हिरमुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:36 PM2020-04-11T19:36:38+5:302020-04-11T19:38:13+5:30
आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढल्यामुळे काऊंटडाऊन करणाऱ्या नागरिकांचे चेहरे हिरमुसले आहेत. एकीकडे कोरोना विषाणूची धास्ती आणि दुसरीकडे उदरनिर्वाहाची चिंता त्यांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत आहे. शनिवारी कोल्हापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये फेरफटका मारताना चिंतेचे ढग वळवाच्या पावसापेक्षाही भयाण वाटत होते.
कोल्हापूर : आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढल्यामुळे काऊंटडाऊन करणाऱ्या नागरिकांचे चेहरे हिरमुसले आहेत. एकीकडे कोरोना विषाणूची धास्ती आणि दुसरीकडे उदरनिर्वाहाची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. शनिवारी कोल्हापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये फेरफटका मारताना चिंतेचे ढग वळवाच्या पावसापेक्षाही भयाण वाटत होते.
गेल्या १८ दिवसांपासून घरात बंद असलेल्यांना आता आणखी १५ दिवस सक्तीने घरातच राहावे लागणार आहे. खिशात पैसा आहे तोवर हसत-खेळत, जुन्या आठवणींमध्ये रमत हे दिवस नागरिकांनी काढले. काहीही करून १४ एप्रिलपासून आपले दैनदिन जीवन सुरू होईल, अशी आशा त्यांना होती; पण कोरोनाचे रुग्ण दर चार दिवसांनी एक याप्रमाणे सापडत असल्याने हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि या सर्व आशेवर पाणी फिरले.
आता पुढचे १५ दिवस करायचे काय आणि खायचे काय असा सर्वांत मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यात सर्वाधिक चिंतेत आहेत ते रोज किरकोळ विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळणारे कामगार. १५ दिवस उधारउसनवारीवर ढकलले. कुणी दिलेल्या मदतीवर चूल पेटती ठेवली; पण आता आणखी १५ दिवस कुणासमोर हात पसरायचे, याची विवंचना त्यांना लागून राहिली आहे.