यड्राव परिसरात वाढते गुन्हे चिंताजनक
By admin | Published: January 8, 2015 10:58 PM2015-01-08T22:58:14+5:302015-01-09T00:03:10+5:30
पोलिसांना आव्हान : पार्वतीमधील पोलीस चौकी कार्यरत ठेवण्याची आवश्यकता
घन:श्याम कुंभार- यड्राव -खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे भरदिवसा झालेल्या खुनातील हल्लेखोरास ग्रामस्थांनी पकडून देऊन पोलिसांचे पूर्ण काम केले. यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचे तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पार्वती औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी कार्यरत ठेवल्यास गुन्ह्यांना आळा बसेल; परंतु यड्राव परिसरात वाढत असणारी गुन्हेगारी चिंताजनक बनत आहे.
यड्राव परिसर पोलीस खात्याकडून संवेदनशील भाग म्हणून ओळखला जात आहे. त्यामध्ये वारंवार घडणाऱ्या या घटना त्यास ठळक करीत आहेत. पैशांची देवाण-घेवाण, खासगी सावकारी, कामाचा ठेका, गटाचे वर्चस्व, महिलांची छेडछाड, उद्योगावर हल्ले, नासधूस करणे, विविध कारणांसाठी सक्तीची वसुली यामुळे वादावादी व सशस्त्र हल्ले या सर्व गोष्टी अंगवळणी पडल्या सारख्या झाल्या आहेत. कारण, घटनेनंतर ‘आपापसात’ होते व ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ याप्रमाणे मागे तसे पुढे.
पोलीस खात्यास तक्रारीची नोंद लागते. त्याशिवाय कायद्याने तपास करता येत नाही. या भूमिकेने तडजोडींना महत्त्व वाढते. यामुळेच सन २००३ मध्ये खोतवाडीमध्ये खोत दाम्पत्याचा खून प्रकरणाचा तपास अद्याप पूर्णत्वास आला नाही. मे २००६ मध्ये ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीत सात ते आठ लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. मे २००९ मध्ये प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये दागिण्यांसह दहा लाखांच्या रोख रकमेची लूट, जिन मंदिरातील दानपेटी या घटनेच्या मुळापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही.
सांगली नाका परिसरातील सराफी दुकानातील चोरी अद्याप उघड झाली नाही. हे सर्व गुन्हे तपासाचे आव्हान पोलिसांना आहे. यासाठी पार्वती औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी कार्यरत ठेवावी. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे गुन्हेगारीस प्रतिबंध बसेल. (उत्तरार्ध)