वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:27 AM2018-07-03T01:27:57+5:302018-07-03T01:28:14+5:30

 Increasing Failure due to Increasing Violence: Psychotherapy Experts | वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

Next
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील घटनेमागील कारणांचा शोध

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.

धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना समूहाने अत्यंत क्रूरपणे ठेचून मारले. कुण्याही संवेदनशील माणसाच्या अंंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. एवढ्या मोठ्या समूहामध्ये ते लोक कोण आहेत, याची कोणतीच चौकशी करावी किंवा त्यांना पोलीस येईपर्यंत हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवावे व त्यानंतर त्यांचा न्याय करावा असे का वाटले नसेल, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात दाटले. एक समाज म्हणून आपण नक्की कोणत्या दिशेने निघालो आहोत याबद्दलही मनात भीतीचे काहूर उमटले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे एका मुलाखतीत म्हटले होते, की मला आज अशी भीती वाटते की येणाऱ्या काळात लोक दिवसाढवळ्या लोकांचे खून पाडतील एवढी अस्वस्थता समाजात साचली आहे. त्यांची भीती सत्यात उतरायला फार वेळ लागलेला नाही. लोक कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडू लागले आहेत.

याच घटनेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांच्याशी संवाद साधला व सामूहिक हिंसेच्या घटनेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.डॉ. चौगले म्हणाले, ‘समाजात बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनांत ताण आहे. मग हा ताण किंवा चीड अशा सामूहिक घटनांतून व्यक्त होत आहे का अशी शंका वाटावी, अशी स्थिती आहे. अशा हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही. आपल्या पुढचा माणूस दगड मारत आहे किंवा लाथ मारत आहे म्हटल्यावर तोदेखील पुढे होऊन त्यामध्ये सहभागी होत आहे. बºयाचदा मारणाºयाला हे माहीत नसते की, आपण कुणाला कशासाठी मारत आहोत. कारण समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.’

सामाजिक हिंसाचारच वाढला असे नसून आपल्या घरातील हिंसाचारही वाढला आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता, समजूतदारपणा किंवा संयम कमी झाला आहे असे सांगून डॉ. चौगले म्हणाले, ‘मग अशा घटनांतून निर्माण होणारा राग व्यक्त करण्यासाठी एखादे असे सामाजिक हिंसेचे आऊटलेट मिळाले की समाज बेभान होत आहे. पूर्वी समाजाला चार-दोन गोष्टींबद्दल तरी किमान आदर असायचा. आता तो कमी झाला आहे. डॉक्टरांवरील अलीकडील काळात वाढलेले हल्ले हे त्याचेच द्योतक आहे.

हा समाज जसा डॉक्टरांवर अविश्वास दाखवीत आहे तसाच तो राजकीय व्यवस्थेबद्दलही, पोलीस यंत्रणेबद्दलही दाखवीत आहे. प्रत्येक पेशामध्ये जसे वाईट आहे, तसे थोडे कमी असले तरी चांगलेही आहे. यावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हा माझ्या मते आजच्या आणि उद्याच्या समाजासमोरीलही मोठा धोका व चिंतेची बाब आहे.’

ही आहेत महत्त्वाची कारणे

धुळ््यात मुले पळवणारी टोळी असल्याचा संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना मारताना समाजाची संवेदनशीलता हरवली
सहनशीलता, समजूतदारपणा, संयम कमी झाल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्या करत आहेत.
सामूहिक हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही.
समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.
बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनात ताण आहे.

Web Title:  Increasing Failure due to Increasing Violence: Psychotherapy Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.