इच्छुक उमेदवारांची वाढली घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2017 11:00 PM2017-02-01T23:00:22+5:302017-02-01T23:00:22+5:30
रेंदाळ, हुपरी गटातील चित्र : जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ होऊनही युत्या, आघाड्यांचा पत्ताच नाही
तानाजी घोरपडे ---हुपरी --जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या युत्या, आघाड्या
अद्यापपर्यंत अस्तित्वातच आलेल्या नसल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांची घालमेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हातकणंगले तालुक्यात एकमेव सर्वसाधारण (खुला) मतदारसंघ असलेल्या रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील वातावरण तुल्यबळ उमेदवारांच्या मांदियाळीमुळे अतिशय गरमागरम झाले आहे. तर ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या हुपरी मतदारसंघात मात्र सर्वत्र ठंडा..ठंडा...कुल..कुल.. अशा पद्धतीचे वातावरण आहे.
माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून उफाळून आलेल्या वर्चस्ववादावर काँग्रेस पक्ष नेतृत्वाने अद्यापपर्यंत सर्वमान्य असा तोडगा काढला नाही. त्यामुळे दोन्हीही गटांचे कार्यकर्ते सैरभैर होऊन तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच भाजप-जनसुराज्य-ताराराणी आघाडीने शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साधे खीजगणतीतही धरले नसल्याने या दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
आवाडे घराण्याचे राजकीय वारसदार युवा नेते राहुल आवाडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उद्योजक महावीर गाठ व शिवसेनेचे शिवाजीराव पाटील यांच्यातच खऱ्या अर्थाने होणारी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामधील लढत ही अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार आहे. तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार सुरेश हाळवणकर यांचे ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व सिद्ध करणारी ही लढाई असणार आहे. गेल्या ४0 वर्षांपासून ग्रामीण जनतेवर असणाऱ्या माजी मंत्री आवाडे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने अगदी सुरुवातीपासूनच साम, दाम, दंड, भेद या कुटनीतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत आवाडे यांचेच नेतृत्व मानणारे भाजपचे उमेदवार महावीर गाठ व पक्षांतर्गत विरोधक असणारे माजी खासदार जयवंतराव आवळे यांनाही हाताशी धरून आवाडे यांचा ग्रामीण भागातील बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. सर्वच बाबतीत सरस असणाऱ्या या दोन्ही तगड्या उमेदवारांनी हाय-फाय प्रचाराला बगल देत मतदारसंघातील पाचही गावांत जाऊन घर टू घर जात प्रत्येक मतदाराला आशीर्वाद देण्याचे आवाहन करीत आहेत. विरोधकांचे सर्व मनसुभे उद्ध्वस्त करणे व ग्रामीण भागावर असणारे आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी माजी मंत्री आवाडे यांनी कसलीही उणीव बाकी ठेवलेली नाही. प्रसंगी सर्व आयुधांचा वापर करून ‘जशास तसे प्रत्युत्तर’ देण्याची तयारी करून ठेवल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्याच्या घडीला आवाडे गटाकडून सज्जन रावळ, राहुल
इंग्रोळे. भाजपकडून स्मिता वीरकुमार शेंडुरे (उमेदवारी जाहीर). माजी खासदार आवळे गटाकडून रजिया अमजद नदाफ. शिवसेनेकडून पूनम राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्र्रेसकडून महेश माळी, मनसेकडून आनंदी बापूसाहेब माळी, तसेच सरपंच दीपाली बाळासाहेब शिंदे, विद्यमान पंचायत समिती सदस्य सुप्रिया नंदकुमार सलगर, माजी सरपंच सुमन सर्जेराव हांडे यांचीही नावे चर्चेत आहेत.
दररोज वेगवेगळी नावे : दाखल्यांचा गोंधळ सुरूच
हुपरी जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये म्हणावा तसा अजिबात उत्साह दिसून येत नाही. इच्छुक महिला उमेदवारांच्या दाखल्यांचा गोंधळ अजूनही सुरू असल्याने सर्वच पक्षांकडून दररोज वेगवेगळी नावे समोर आणली जात आहेत.
परिणामी, मतदारसंघात निवडणूक आहे की नाही, अशी परिस्थिती असून, घाईगडबड, गटा-तटाची व पक्षीय ईर्षा अशा प्रकारचे कसलेही निवडणुकीचे वातावरण कोठेच पाहावयास मिळत नाही. सर्वत्र अगदी ‘ठंडा..ठंडा...कुल..कुल’ असे वातावरण असल्याचे चित्र अनुभवण्यास मिळत आहे.