जयसिंगपुरात वाढती रुग्णसंख्या; प्रशासनाची वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:37+5:302021-04-07T04:25:37+5:30
जयसिंगपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्या ३४ वर पोहोचली असून याचा फैलाव ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी ...
जयसिंगपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्या ३४ वर पोहोचली असून याचा फैलाव ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना कोरोना नियमावलींचे पालन करण्याबाबतचे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिलेल्या आदेशानुसार ४५ वयोगटावरील सर्व नागरिकांना लस देण्याबाबत शहरासह ग्रामीण भागात कार्यवाही सुरू करण्यात आली. सध्या जयसिंगपूर शहरात सर्वाधिक रुग्ण असून ग्रामीण भागात याचा फैलाव होवू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांचाही प्रतिसाद तितकाच महत्त्वाचा असणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही दिसून येते. तरुण वर्ग मास्कचा वापर करत नसल्याचे चित्र आहे. भाजी व फळे विक्रेत्यांच्या अॅन्टिजेन तपासणीचा विषयही मागे पडला आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची गरज आहे.