खंडपीठ आंदोलनास वाढता पाठिंबा, माजी सचिवांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:26 AM2019-03-29T11:26:28+5:302019-03-29T11:28:15+5:30
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेले काम बंद आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशी सुरूच राहिले. यात बार असोसिएशनच्या माजी सचिवांनी दिवसभर झालेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. भागीरथी महिला संघटनेच्या अरुंधती महाडिक यांच्यासह विविध संघटना व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी पत्र देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेले काम बंद आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशी सुरूच राहिले. यात बार असोसिएशनच्या माजी सचिवांनी दिवसभर झालेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. भागीरथी महिला संघटनेच्या अरुंधती महाडिक यांच्यासह विविध संघटना व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी पत्र देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
कोल्हापुरासह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांसाठी ‘कोल्हापूर’ हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खंडपीठ मिळावे, या मागणीसाठी गेल्या ३० वर्षांपासून वकील संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. यासाठीच सहा जिल्ह्यांतील वकिलांनी आंदोलन पुकारले आहे. यात २५ मार्च ते १ एप्रिल असे सात दिवस कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बार असोसिएशनच्या आतापर्यंतच्या सर्व माजी सचिवांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात असोसिएशनचे माजी सचिव अॅड ए. एस. देसाई, अरुण पाटील, शिवराम जोशी, प्रशांत देसाई, सुधीर चव्हाण, सतीश खोतलांडे, सर्जेराव खोत, रवींद्र जानकर, इंदिरा राजेपांढरे, राजेंद्र मंडलिक, पिराजी भावके, पीटर बारदेस्कर, किरण महाजन, व्ही. आर. पाटील, श्रीकांत साळोखे यांनी सहभाग घेतला. यावेळी पी. बी. (अण्णा) बंडगर, अतुल जोशी, अनंत सांगावकर, बी. एस. पाटील, आदी वकील व पक्षकार हजर होते.
यावेळी बोलताना गडहिंग्लज बारचे अध्यक्ष सुधाकर पोवार, गारगोटी बारचे अॅड. संजय भोसले यांनी वकील व पक्षकारांचा मेळावा घेण्याच्या सूचना केल्या; तर विश्वास चुडमुंगे, इसाक समडोळे, हॉटेल संघाचे उज्ज्वल नागेशकर यांनी पक्षकारांना कमीत कमी पैशांत राहण्याची सोय कोल्हापुरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. भागीरथी महिला संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनीही संघटनेतर्फे पाठिंबा व्यक्त केला. हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, उमेश राऊत व क्रांतिगुरू लहूजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय माळवी, अमोल कुरणे, अॅड. दत्ताजी कवाळे, अॅड. रणजित कवाळे, पूजा डेव्हलपर्सचे मालक व जैन श्रावक संघटनेचे पारस ओसवाल यांनीही पाठिंबा दिला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस, सचिव अॅड. सुशांत गुडाळकर खंडपीठाविषयी महत्त्व पटवून देत उपस्थितांचे आभार मानले.
----
- सचिन