विदेशी भाषा शिकण्याकडे वाढता कल : शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:57 AM2018-05-24T00:57:06+5:302018-05-24T00:57:06+5:30

 Increasing trend towards foreign language learning: Independent departments at Shivaji University | विदेशी भाषा शिकण्याकडे वाढता कल : शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र विभाग

विदेशी भाषा शिकण्याकडे वाढता कल : शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र विभाग

Next
ठळक मुद्देगेल्या २० वर्षांत १५०० जणांनी घेतले शिक्षण; रोजगाराच्या संधी

संतोष मिठारी ।
कोल्हापूर : भाषांतरकार, दुभाषिक या पदांवरील नोकरी, साहित्य अनुवाद करणाऱ्यांची वाढती मागणी यामुळे कोल्हापुरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरदारांना विदेशी भाषा शिकण्याची आवड लागली आहे. गेल्या २० वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातून सुमारे १५०० जणांनी रशियन, जर्मन, जपानी भाषांचे शिक्षण घेतले आहे.

विद्यापीठात १९७० मध्ये रशियन भाषाकेंद्राची स्थापना झाली. त्यानंतर विद्यापीठाने या केंद्रात सन १९९८ विदेशी भाषा विभाग सुरू केला. जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक परिस्थितीची जाणीव झाल्याने सध्या असणाºया शैक्षणिक पात्रतेला एखाद्या विदेशी भाषेची जोड देण्याची संकल्पना कोल्हापुरात रुजू लागली. त्यासाठी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाकडे विद्यार्थी येऊ लागले. या विभागात रशियन, जर्मनी, जपानी भाषांचे तीन वर्षांत शिक्षण दिले जाते. त्यात पहिल्या वर्षी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, दुसºया वर्षी पदविका आणि तिसºया वर्षी उच्च पदविका अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण देण्यात येते. विदेशांमधील अभियांत्रिकी, हॉटेल टुरिझम, व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये संधी असल्याने विदेशी भाषा शिकण्याकडे कल आहे. त्यासह पारंपरिक विद्याशाखांत शिक्षण घेणारे अतिरिक्त पात्रता असावी, म्हणून विदेशी भाषा शिकत आहेत. त्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींसह अधिकारी, अभियंते, प्राध्यापक, नोकरदार, आदींचा समावेश आहे.

फ्रेंच भाषा अभ्यासक्रम सुरू करणार
बहुराष्ट्रीय तसेच देशातील विविध कंपन्यांमध्ये भाषांतरकार, दुभाषी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.त्यामुळे विदेशी भाषेचे शिक्षण घेण्याकडे कल वाढल्याचे विदेशी भाषा विभागाच्या प्रभारी प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, गेल्या २० वर्षांत विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातून १५०० जणांनी रशियन, जपानी, जर्मनी भाषांचे शिक्षण घेतले आहे. विदेशी भाषा प्रशिक्षणातील विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्याची तयारीसाठी अद्ययावत भाषा प्रयोगशाळा आहे.

विद्यापीठातील भाषा भवन
शिवाजी विद्यापीठाने सन १९९८ मध्ये खांडेकर यांची जन्मशताद्बी साजरी केली. त्यावेळी भाषा विषय अध्यापनासाठी विद्यापीठामध्ये स्वतंत्र भवन निर्माण करण्याचा निर्णय झाला.
त्याला वि. स. खांडेकर यांचे नाव देण्याची अनौपचारिक कल्पना पुढे आली. सन २००२-०३च्या दरम्यान हे भवन तयार झाले. ते खांडेकर यांच्या स्मृतीचे रजत वर्ष होते.
हे औचित्य लक्षात घेऊन विद्यापीठाने वि. स. खांडेकर भाषाभवन सुरू केले. या भवनमध्ये वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय, सभागृह आणि मराठी, हिंदी, इंग्रजी आणि विदेशी भाषा विभाग आहे.

या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण पात्रता आहे. रशियन भाषेचे वर्ग दुपारी चार ते पाच, तर जर्मन, जपानी भाषेचे वर्ग सायं. सहा ते सात या वेळेत भरतात.
मराठी, इंग्रजी माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते.

 

शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातून सन २००६-०७ मध्ये जपानी भाषेचे शिक्षण घेतले. यानंतर सन २००९ मध्ये जपान सरकारच्या शिष्यवृत्तीवर मी जपानचा १५ दिवसांचा दौरा केला. यानंतर या भाषेतील पुढील शिक्षण सुरू ठेवले.
- रविंद्र सातपुते, उजळाईवाडी

महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर मी रशियन भाषेचे शिक्षण घेतले. सध्या नाशिकमधील हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स् लिमिटेडमध्ये रशियन भाषांतरकार म्हणून मी काम करीत आहे. येथे विशेषत: लढाऊ विमानांच्या तांत्रिक माहितीच्या भाषांतराचे काम करीत आहे.
-अभिषेक जोशी, कागल

Web Title:  Increasing trend towards foreign language learning: Independent departments at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.