भात मळणीसाठी ट्रॅक्टरचा वाढता वापर
By admin | Published: November 17, 2014 11:29 PM2014-11-17T23:29:00+5:302014-11-17T23:53:30+5:30
आजरा तालुका : पर्यावरणपूरक शेतीला धोका; भाताच्या उत्पादनात घट
कृष्णा साावंत -- पेरणोली --आजरा तालुक्यात भात सुगीचा हंगाम जोरदार सुरू झाला असून, पारंपरिक बैलांच्या मळणीऐवजी शेतकरी आता ट्रॅक्टरने भात मळणी काढू लागल्याने तालुक्यात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.
शेती, बळिराजा आणि बैलांचे अतूट असे नाते आहे. बैलाद्वारे केलेली शेती पर्यावरणपूरक मानली जाते. मात्र, औद्योगिक प्रगती झाली तशी शेतीमध्येही यंत्रसामग्री वाढत चालली आहे. शेतामध्ये आता बैलांना दिल्या जाणाऱ्या हाका कमी ऐकू येऊ लागल्या आहेत. त्याऐवजी ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, मळणीयंत्र यांचा आवाज घुमू लागला आहे.
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र भात मळणीची धांदल उडाली आहे. बैलांचे वाढलेले दर, खाद्यांच्या वाढलेल्या किमती आणि बैल बाळगण्याची शेतकऱ्यांमधील उदासीनता यामुळे बैल बाळगणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याऐवजी भाड्याने यंत्र घेऊन शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनुसार खळ्यावर तिढा पद्धतीने मळणी काढली जात होती. तिढ्याला एक बैल बांधून त्याच्यासोबत पाच-सहा जनावरे बांधली जात होती. त्यांच्या पाठीमागे बैल हाकण्यासाठी एक व्यक्ती असायची. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून ही पद्धत बंद होऊन दोन बैलांची पाटा पद्धत आली. सध्या काही शेतकरीच पाटा पद्धतीचा अवलंब करतात.
चालू हंगामात मात्र बहुतांश शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर व मळणी यंत्राकडे आहे. बैलांद्वारे होणाऱ्या मळणीत आणि यंत्राद्वारे होणाऱ्या मळणीत मोठा फरक आहे. यंत्राद्वारे काढलेली मळणी लवकर होत असली, तरी बैलांच्या मळणीतून मिळणारे भात अधिक आहे.
बैलांच्या मळणीतून मिळणारा आनंद कमी होत चालला आहे. शेतीत वाढत चाललेल्या यंत्रसामग्रीमुळे बैलांच्या पर्यावरणपूरक शेतीला धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांनी घनसाळ, रत्नागिरी, सारथी, सोनम यासह
नवीन बियाणे वापरली
आहेत.
मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने व मानमोडी रोगामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाताच्या उत्पादनात घट झाली आहे.