कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
By admin | Published: August 5, 2016 01:44 AM2016-08-05T01:44:22+5:302016-08-05T02:01:15+5:30
धरण क्षेत्रातील पावसाचा परिणाम : शाहूवाडीतील पाच बंधारे पाण्याखाली; अणुस्कुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद
जयसिंगपूर : धरणक्षेत्रात कोसळत असलेला धुवाधार पाऊस व तालुक्यात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कृष्णेच्या पाणीपातळीत दहा फुटाने, तर पंचगंगेच्या पाणीपातळीत सात फुटाने वाढ झाली आहे. अलमट्टी धरणात येणारे पाणी आणि होणारा विसर्ग याकडे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णेसह, दुधगंगा, पंचगंगा, वारणा, आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गुरुवारी उदगाव-अंकली पुलावर कृष्णेची पाणीपातळी २७.११ फूट, कुरुंदवाड दिनकरराव यादव पुलाजवळ पंचगंगेची पाणीपातळी ४८.०३ फूट, तर राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची पाणीपातळी ३५.०६ फूट होती. गुरुवारी दिवसभर हलका पाऊस झाला. पुराचे पाणी वाढत असले, तरी आलमट्टी धरणातील पाण्याबाबत प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे.
कनवाड बंधारा पाण्याखाली
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कनवाड-म्हैसाळ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. परिणामी, खासगीसह शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या पावसामुळे अर्जुनवाड,या नदीकाठच्या भागात वीटभट्टीसाठी माती उपसा करण्यात आली आहे. यामुळे मळीची माती मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. येथील अरविंद चौगुले यांच्या पोटमळीत जल आयोग केंद्राद्वारे पाच आर.सी.सी.पोल उभे केले होते; परंतु चौगुले यांची मळी पुरात वाहून
गेल्याने खांबही पुरात वाहून गेले आहेत.
शाळी नदीला पूर
मलकापूर : मलकापूर परिसरात गेली चार दिवस पावसाची संततधार सुरू आहे. शाळी नदीला आलेल्या पुरामुळे शाहूवाडी-कोळगाव रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे, तर कडवी नदीला आलेल्या पुरामुळे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कडवी नदीवरील पेरीड- कोपार्डे, शिरगाव, सौते- सावर्डे, पाटणे व बर्की बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शाहूवाडी-कोळगाव रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने अणुस्कुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
इचलकरंजीत जुना पूल वाहतुकीस बंद
इचलकरंजी : शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी दिवसभरामध्ये तीन फूट वाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या पुलावर दीड फूट पाणी आल्यामुळे तो बुधवारी (दि. ३) मध्यरात्रीपासून बंद असेल.
चंदगडमधील नऊ बंधारे पाण्याखाली
चंदगड : चंदगडला गुरुवारी तिसऱ्या दिवशी पाऊस कमी झाला असला, तरी तालुक्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, गवसे, इब्राहिमपूर, कानडी, सावर्डे व अडकूर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड येथील ताम्रपर्णी नदीवरील पुलावर पाणी आल्याने हेरे, तिलारी, पारगड मार्ग बंद होता.
कोवाड येथील रघुनाथ दत्तू निट्टूरकर यांच्या घराची पडझड होऊन १५ हजारांचे नुकसान झाले. सुपे येथील राधाबाई कृष्णा पाटील यांच्या घराची पडझड होऊन दहा हजारांचे नुकसान झाले व लक्ष्मण पुंडलिक बिजगर्णीकर यांच्या घराची किरकोळ पडझड होऊन आठ हजारांचे नुकसान झाले.
मुरकुटवाडी येथील पांडुरंग भैरू पवार यांच्या घराची भिंत कोसळून २० हजारांचे नुकसान झाले. तसेच आप्पाजी भैरू सुभेदार यांच्याही घराची भिंत कोसळून १५ हजारांचे नुकसान झाले.नागरदळे येथील शकुंतला सुरेश कोकितकर यांच्या घराची भिंत कोसळून २४ हजारांचे नुकसान झाले. पोरेवाडी येथील उत्तम गोविंद पाटील यांची विहीर कोसळून २० हजारांचे नुकसान, दुंडगे येथील नागोजी महादेव नाईक यांची घराची भिंत कोसळून २५ हजारांचे नुकसान झाले.
साळगाव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
पेरणोली : साळगाव (ता. आजरा) येथील बंधारा मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. बंधारा पाण्याखाली गेल्याने आजरा-पेरणोली मार्गावरील वाहतूक ठप्प असून,
पर्यायी सोहाळे मार्गे वाहतूक सुरू आहे.