‘बोगस नळ जोडणी’ दोघांचा नाहक बळी
By admin | Published: February 9, 2017 12:14 AM2017-02-09T00:14:42+5:302017-02-09T00:14:42+5:30
निर्देश देणारेच बाजूला : नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
इचलकरंजी : शहरातील जवाहरनगरमध्ये देण्यात आलेल्या बोगस नळ जोडण्यांप्रकरणी दोषी धरून फिटर नामदेव वड्ड व सहायक आनंदा लाखे यांच्यावर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. मात्र, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती व जलअभियंता यांच्या निर्देशाने नळ जोडण्या देण्यात आल्यामुळे याप्रकरणी या दोन्ही कर्मचाऱ्यांचा नाहक बळी गेल्याची चर्चा नगरपालिकेकडील पाणीपुरवठा विभागाकडे बुधवारी दिवसभर होती.
जवाहरनगरमधील कबनूर गावठाणात असलेल्या तीन वसाहतींचा समावेश इचलकरंजी नगरपालिका हद्दीमध्ये झाला. त्यावेळी या हद्दीतील नागरिकांना नळाचा पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित परिसरातील नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ व जलअभियंता ए. एन. जकीनकर यांच्यावर दबाव आणून नळ जोडण्या देण्यास भाग पाडले. तेव्हा प्रथम नळ जोडण्या देऊन त्यानंतर संबंधित कागदपत्रे पूर्ण करून घ्यावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे ६१२ नळ जोडण्या दिल्या गेल्या.
नळ जोडण्या दिल्यानंतर काही दिवसांत नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अवैधरित्या जोडण्यात आलेल्या नळ जोडण्या वैध करण्यासाठी कोणीच स्वारस्य दाखविले नाही. परिणामी, या परिसरातील नळजोडण्या बोगस झाल्या.
दरम्यानच्या काळात जलअभियंता जकीनकर यांची बदली होऊन गेली. त्यांच्या जागी आलेले जलअभियंता सुरेश कमळे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी याबाबतचा अहवाल मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे दिला. त्यावरून डॉ. रसाळ यांनी वड्ड व लाखे या दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. वास्तविक पाहता या दोघांनी सभापती व जलअभियंता यांच्या निर्देशानुसार या नळ जोडण्या दिल्या. ही बाब मात्र यामुळे दुर्लक्षित राहिली आहे. परिणामी, या दोघांचा बळी गेल्यामुळे नगरपालिकेत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)