बेमुदत साखळी उपोषण तात्पुरते स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:34+5:302021-08-19T04:29:34+5:30
पेठवडगाव : येथील एका हॉस्पिटलवर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्र दिल्यानंतर स्थगित ...
पेठवडगाव : येथील एका हॉस्पिटलवर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्र दिल्यानंतर स्थगित करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, शहरप्रमुख व नगरसेवक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका चौकात आंदोलन सुरू होते.
येथील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही, बिल दिले जात नाही अशा विविध तक्रारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू होते. दरम्यान, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे इन कॅमेरा जबाब घेतले.
अखेरीस तिसऱ्या दिवशी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी माळी यांनी संबंधित हॉस्पिटलकडे खुलासा मागितला आहे, त्याची पडताळणी करून पुढील योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले. यावेळी १ सप्टेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी झाकीर भालदार, बबलू खाटीक, सागर साखळकर, भालचंद्र कोळी, रोहन सुनगार, विशाल पाटील, प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान व्यवस्थापनाने कुडाळकर हाॅस्पिटलवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. नियमांनुसार रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. विनाकारण आरोप करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
0000
फोटो ओळ
पेठवडगाव येथील पालिका चौकात हॉस्पिटलवर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलकांशी चर्चा करताना जिल्हा शल्यचिकित्सक ए. डी. माळी, जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, संदीप पाटील, प्रवीण पाटील, सागर साखळकर, भालचंद्र कोळी, आदी उपस्थित होते. (छाया : क्षितिज जाधव)