सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बेमुदत रजा आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:19+5:302021-04-30T04:28:19+5:30
कोल्हापूर : कायम सेवेत समावेशन करावे, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील ...
कोल्हापूर : कायम सेवेत समावेशन करावे, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी यांनी गुरुवारपासून पुकारलेले बेमुदत सामूहिक रजा आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित केले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव सौरभ विजय यांनी केलेल्या आवाहनानुसार या प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
या समावेशनासाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या सर्व अस्थायी सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी अनेकदा शासनाला निवेदने दिली. मात्र, शासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नसल्याने या प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील २५ अस्थायी सहायक प्राध्यापक आणि १९ वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार होते. त्यावर बुधवारी सायंकाळी डॉ. तात्याराव लहाने आणि सौरभ विजय यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यात राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामध्ये कोरोनाचा संसर्ग आणि रुग्ण वाढत असताना आंदोलन करू नये. सध्या तुमची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तुमच्या मागणीबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या प्राध्यापक, अधिकाऱ्यांनी पुढील १५ दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय रात्री घेतला आहे. त्यानुसार नेहमीप्रमाणे वैद्यकीय सेवा बजावित आहेत. आमच्या मागणीबाबत शासनाने लवकर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी कोल्हापुरातील सहायक प्राध्यापक डॉ. योगेश पाटील यांनी गुरुवारी केली.
चौकट
रुग्णालय प्रशासनाला दिलासा
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत हे आंदोलन झाले असते, तर रुग्ण, प्रशासनाची मोठी अडचण झाली असती. आंदोलन स्थगित झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.