अंगणवाडी कर्मचारी २६ जानेवारीपासून बेमुदत संपावर, याआधीही महाराष्ट्र शासनाला दिली होती नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:35 PM2023-01-24T13:35:46+5:302023-01-24T13:58:23+5:30
इसीबी कार्यक्रमाचे नोव्हेंबर २०२१ पासूनचे पैसे मिळालेले नाहीत, ते त्वरित मिळावेत. मोबाइल रिचार्ज मिळालेला नाही
कोल्हापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी २६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाची नोटीस आणि मागण्यांचे निवेदन सोमवारी संघटनेच्या वतीने शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देण्यात आले.
इसीबी कार्यक्रमाचे नोव्हेंबर २०२१ पासूनचे पैसे मिळालेले नाहीत, ते त्वरित मिळावेत. मोबाइल रिचार्ज मिळालेला नाही, तो मिळावा. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षा लागू करावी, तसेच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासन जिल्हा परिषद सेवेत सामावून घ्यावे, पोषण ट्रॅकरमधील ऑनलाइन काम योग्य पद्धतीने करता येण्यासाठी शासनाने ताबडतोब चांगल्या क्षमतेचे नवीन मोबाइल किंवा टॅब देईपर्यंत पोषण ट्रॅक्टर कामाची सक्ती करू नये,
माहिती भरण्यासह सर्व कामकाज मराठीतून असणारा निर्दोष ॲप उपलब्ध करून द्यावे, लाभार्थ्यांच्या आधार करण्याची जोडणी केली नाही तरी त्यांना आहारापासून वंचित ठेवू नये, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याआधीही महाराष्ट्र शासनाला या संपाची नोटीस दिली असून, जर याबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत तर २६ जानेवारीपासून बेमुदत काम बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.