चंदगडला १६ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:40+5:302021-01-19T04:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून, बसर्गे ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांनी, कोवाड ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण, हलकर्णी ग्रामपंचायतीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भरमाण्णा गावडा यांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली निवडणूक लढवून सत्ता राखली तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या शिनोळी खुर्द व नांदवडे येथील अॅड. संतोष मळवीकर यांच्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले.
याठिकाणी दोघांकडूनही स्थानिक आघाडीने सत्ता हिसकावून घेतली आहे तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक ग्रामदेवतांच्या नावाने स्थापन केलेल्या आघाड्यांना संमिश्र यश मिळाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता दाटे येथील ग्रामपंचायतीचा निकाल तहसीलदार विनोद रणवरे यांनी जाहीर केला. दाटे, शिनोळी खुर्द, कळसगादे, होसूर, माडवळे, नांदवडे, इब्राहिमपूर, तुडये, पाटणे, बोजुर्डी, कालकुंद्री, किणी, देवरवाडी, किटवाड, मांडेदुर्ग, आसगाव या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. चिंचणे येथे एका जागेसाठी निवडणूक लागली होती. येथे कल्याणी किरण पाटील या विजयी झाल्या तर तीन जागा बिनविरोध झाल्या असून, तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. तुडये येथे आमदार राजेश पाटील व माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या युतीने सत्ता मिळवली. तालुक्यातील २० ग्रामपंचायतींमध्ये भरमुआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. तर ५ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली असून, हलकर्णी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन होणार आहे. उर्वरित १७ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामदेवतेच्या नावाने स्थापन झालेल्या स्थानिक आघाड्यांची सत्ता स्थापन होणार आहे. म्हाळेवाडी, धुमडेवाडी, मलतवाडी, केरवडे, मुगळी, कानडी, घुल्लेवाडी, ढोलगरवाडी या आठ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी निकालानंतर अनेक गावांमध्ये फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
............
शिनोळी खुर्द येथे समान मते
शिनोळी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये कांचन नारायण पाटील व कांचन परशराम मन्नोळकर या दोन उमेदवारांना 254 इतकी समान मते पडली. यावेळी दहा वर्षाच्या विद्यार्थींनी खुषी प्रणय गोंडावळे हिच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीमध्ये कांचन परशराम मन्नोळकर यांना विजयी घोषीत करण्यात आले.
............
सख्य्या भावांचा सामना
देवरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये वामन हिरामणी जाधव व राजाराम हिरामणी जाधव हे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणुक लढवत होते. यामध्ये 201 मते घेवून राजाराम हिरामणी जाधव हे विजयी झाले तर वामन हिरामणी जाधव यांना केवळ 15 मते मिळाली.तर बसवंत धोंडीबा कांबळे हे उमेदवार केवळ १ मताने विजयी झाले.