स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करणार : नवाळे
By admin | Published: August 5, 2015 12:04 AM2015-08-05T00:04:33+5:302015-08-05T00:04:33+5:30
बालवाडी शिक्षिकांचा वेतनप्रश्न : पालकमंत्र्यांनी चेष्टा केल्याचा आरोप
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमची चेष्टा केली आहे. शासनाने बैठक घेऊन बालवाडी शिक्षिका सेविकांबाबत वेतन सुरू करण्याबाबत ठोस निर्णय न देल्यास १५ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य बालवाडी शिक्षिका सेविका महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंजली नवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बालवाडी शिक्षिका, सेविकांना शासनाकडून वेतन मिळावे, विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, निश्चित अभ्यासक्रम असावा, शिक्षण सेविकांना सेवा शाश्वती मिळावी, सर्व बालवाड्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ मार्चला आमरण उपोषण करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १४ मेपर्यंत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक घडवू, असे लेखी आश्वासन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यामार्फत २९ मार्चला महासंघाला दिले होते. त्यानुसार आमरण उपोषण मागे घेण्यात आले पण त्यानंतर पालकमंत्र्यांंना या गोष्टीचा विसर पडला. पावसाळी अधिवेशन संपले तरी अजूनही याप्रश्नी बैठक घेण्याची कोणतीच सूचना दिलेली नाही किंवा आमची दखल कोणी घेतली नाही. पालकमंत्र्यांनी आमची चेष्टा केली आहे. त्यामुळे १५ आॅगस्टपूर्वी आमच्या मागण्यांबाबत शासनाच्यावतीने बैठक घेतली नाही तर पंधरा आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व बालवाडी शिक्षिका व सेविकांच्यावतीने सामूहिक आत्मदहन केले जाईल. (प्रतिनिधी)
सेवा शाश्वतीची मागणी
जिल्ह्यात एकूण चार हजार ५०० शिक्षिका व सेविका आहेत, तर राज्यात वीस हजार शिक्षिका व सेविका आहेत. त्यांना किमान पाच हजार रुपये वेतन मिळावे तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा. यासह सेवा शाश्वती मिळावी, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.