पश्चिम महाराष्ट्र, कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:07 PM2019-07-11T12:07:58+5:302019-07-11T12:09:11+5:30
कोल्हापूरशी निगडित विविध महत्त्वाच्या मागण्यांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी प्रा. मंडलिक यांनी पश्चिम महाराष्ट्र, संलग्न कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली.
कोल्हापूर : कोल्हापूरशी निगडित विविध महत्त्वाच्या मागण्यांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी प्रा. मंडलिक यांनी पश्चिम महाराष्ट्र, संलग्न कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली.
कोल्हापूरलगतच्या कोकणपट्ट्यातही भातशेती मोठ्या प्रमाणात पिकविली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसशेती भरपूर असून पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांची संख्या लक्षणीय आहे. हा भाग दुर्गम व डोंगरी असून याठिकाणी शेती पदवीधारक विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
त्याठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ झाल्यास विद्यापीठांतर्गत पिकांच्या नवीन दर्जेदार प्रजाती व वाणांचा अभ्यास करता येईल. या पार्श्वभूमीवर, पश्चिम महाराष्ट्र व कोकणकरिता एक नवीन कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केली. शिवसेना संसदीय गटनेते खासदार विनायक राऊत यावेळी उपस्थित होते.
पुनर्वसनासाठी जास्त निधी द्यावा
तिवरे धरण फुटल्यानंतर वाहून गेलेल्या नागरिकांना आणि तिवरे ग्रामस्थांना पंतप्रधान साहाय्यता निधीअंतर्गत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी खासदार मंडलिक आणि खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.