स्वतंत्र चॅनेल निवडण्याची सोय उपलब्ध, ग्राहकांना दिलासा : केबल सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 02:06 PM2019-02-09T14:06:44+5:302019-02-09T14:08:27+5:30
केबलचालकांच्या पॅकेजऐवजी स्वत:च चॅनेल निवडून स्वत:चे पॅकेज तयार करण्याची मुभा केबलग्राहकांना मिळाली आहे. त्यामुळे केबलचालकांनी तयार केलेले पॅकेज घेण्याची सक्ती आता ग्राहकांवर असणार नाही. तसेच चॅनेल निवडीपर्यंत केबल बंद राहणार नसल्याने टी.व्ही.च्या प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर : केबलचालकांच्या पॅकेजऐवजी स्वत:च चॅनेल निवडून स्वत:चे पॅकेज तयार करण्याची मुभा केबलग्राहकांना मिळाली आहे. त्यामुळे केबलचालकांनी तयार केलेले पॅकेज घेण्याची सक्ती आता ग्राहकांवर असणार नाही. तसेच चॅनेल निवडीपर्यंत केबल बंद राहणार नसल्याने टी.व्ही.च्या प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘ट्राय’च्या आदेशानुसार शुक्रवार (दि. ८) पर्यंत चॅनेल निवडण्याची शेवटची मुदत दिली होती. तथापि ती वाढविण्यात आली असून, चॅनेल निवडेपर्यंत सेवा खंडित करू नये, अशा सूचनाच वितरकांना ‘ट्राय’कडून आल्या आहेत. त्यामुळे प्रक्षेपण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय गुरुवारी रात्रीच चॅनेल कंपन्यांकडून वितरकांना स्वतंत्र चॅनेल निवडण्याची सोयही उपलब्ध करून देणारी लिंक दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी आपापल्या पसंतीनुसार चॅनेलची निवड करून त्यांची यादी केबल आॅपरेटरकडे दिल्यास त्याप्रमाणे पैशांची आकारणी होणार आहे. १०० मोफत चॅनेलसाठी मात्र १५३ रुपये मोजावेच लागणार आहेत. यापुढील प्रत्येक चॅनेल स्वतंत्ररीत्या निवडून अथवा कंपन्यांनी बल्क स्वरूपात दिलेली चॅनेलची सवलत ग्राहकांना घेता येणार आहे.