सैन्य भरतीतील स्टेरॉईड रोखण्यासाठी स्वतंत्र समिती, औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांना सूचना
By उद्धव गोडसे | Published: December 12, 2023 12:21 PM2023-12-12T12:21:12+5:302023-12-12T12:23:13+5:30
भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून स्टेरॉईडचा वापर होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गेल्या वर्षी उघडकीस आणला होता
उद्धव गोडसे
कोल्हापूर : अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून होणारा स्टेरॉईडचा वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. या समितीमार्फत औषध विक्रेत्यांवर नजर राहणार आहे. तसेच स्टेरॉईडचा वापर केल्याचे निदर्शनास येताच दोषी उमेदवारांना भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार असल्याची माहिती सैन्य भरती अधिकाऱ्यांनी दिली. भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून स्टेरॉईडचा वापर होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गेल्या वर्षी उघडकीस आणला होता.
सैन्य भरती प्रक्रियेत धावण्याच्या चाचणीत पात्र ठरण्यासाठी अनेक उमेदवार स्टेरॉईडचा वापर करतात. अशा अनैसर्गिक प्रकारांमुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होतो. शिवाय स्टेरॉईडचा डोस, इंजेक्शन घेऊन धावणाऱ्या उमेदवारांच्या प्रकृतीवर याचा गंभीर परिणाम होतो.
गेल्या वर्षी कोल्हापुरात झालेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांनी स्टेरॉईडचे इंजेक्शन घेतल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. सैन्य दलाने याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण देशभर सैन्य भरतीसाठी नियमावली निश्चित केली. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. स्टेरॉईडचा वापर टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असून, यात औषध प्रशासन अधिकारी आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोषी आढळणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवून भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार स्टेरॉईड आणि अशा प्रकारच्या औषधांची विनाचिठ्ठी विक्री होऊ नये, यासाठी औषध वितरक आणि विक्रेत्यांना लेखी सूचना दिल्या आहेत. राजारामपुरी आणि सायबर परिसरातील मेडिकलची तपासणी सुरू आहे. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेदरम्यानही औषध प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती औषध प्रशासन अधिकारी अश्विन ठाकरे यांनी दिली.
गेल्या वर्षी दोन परवाने रद्द
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्टेरॉईडचे इंजेक्शन विकल्याप्रकरणी औषध प्रशासनाने गेल्या वर्षी शहरातील काही औषध वितरक आणि विक्रेत्यांवर छापेमारी केली होती. दोषी आढळलेल्या दोन विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई औषध प्रशासनाने केली होती.
अशी असेल भरती प्रक्रिया
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात रविवारी (दि. १०) रात्रीपासून सुरू होणारी भरती प्रक्रिया १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी सुमारे १० हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘लोकमत’च्या बातमीने यंत्रणेत सुधारणा
सैन्य भरती प्रक्रियेत स्टेरॉईडचा वापर होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. याची दखल घेऊन सैन्य अधिकाऱ्यांकडून स्टेरॉईडमुक्त भरती प्रक्रिया राबविण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार स्वतंत्र समितीमार्फत यावर नजर ठेवली जाणार आहे.