कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला धक्का; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शाहू आघाडीतून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:39 PM2024-09-19T13:39:00+5:302024-09-19T13:40:16+5:30
शिरोळच्या राजकारणात नवी चाल, केंद्रीय आयोगाकडून आघाडीस मान्यता
कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघाचे महायुतीसोबत असलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष की महायुतीकडून लढणार, याबाबत संभ्रमावस्था असतानाच त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे आमदार यड्रावकर हे पुन्हा याच आघाडीकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर अडचणीत आलेले यड्रावकर अपक्ष लढून विजयी झाले. लगेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीतून राज्यमंत्रिपद मिळवले. शिवसेना फुटल्यानंतर ते सत्तेसोबत गेले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सहयोगी आमदार म्हणून पाठिंबा दिला. आगामी विधानसभेला त्यांनी पुन्हा अपक्ष लढावे, असा त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. महायुतीचे उमेदवार झाल्यास दलित, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण कसे होईल, याचीही चाचपणी ते करत आहेत. शरद कारखान्याच्या वार्षिक सभेत विधानसभा निवडणुकीबाबत जनता काय सांगेल तसा निर्णय घेऊ, असेही यड्रावकर यांनी जाहीर केले होते.
त्याचदरम्यान, त्यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्तावित केलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडी या राजकीय पक्षाला आयोगाने मान्यता दिली. राजर्षी शाहू विकास आघाडीला यापुढे स्थानिक विकास संस्थांबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठीदेखील उमेदवारांना नामनिर्देशित करता येणार आहे. पक्ष नोंदणीसाठी उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. सतीश बोरुलकर, ॲड. मनोज पाटील व स्थानिक ॲड. विजय गजगेश्वर यांचे सहकार्य मिळाले.
महायुती फाट्यावर..
महायुतीसोबत गेल्यास दलित-मुस्लिम मते मिळण्यात अडचणी येतील, असा फिडबॅक त्यांना मतदारसंघातून मिळत आहे. त्यामुळे स्वत:च्याच शाहू आघाडीकडून लढून जिंकून यायचे आणि सत्ता येईल त्याला पाठिंबा द्यायचा, असे त्यांचे भविष्यातील नियोजन असू शकते. परंतु, महायुतीतीलच सहयोगी आमदार या युतीतील पक्षांना सोडून देत असल्याचे चित्र त्यातून पुढे आले आहे.
संविधानाचा आदर राखून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जनहिताचे काम करणे, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आणि विकासाला चालना देणे ही राजर्षी शाहू विकास आघाडीसमोरची प्रमुख उद्दिष्टे आहेत. - संजय पाटील-यड्रावकर, राजर्षी शाहू आघाडी प्रमुख, जयसिंगपूर