जॅकवेलची ‘तृष्णा’ भागविण्यासाठी स्वतंत्र पाणी योजना
By admin | Published: December 31, 2015 11:37 PM2015-12-31T23:37:21+5:302016-01-01T00:03:02+5:30
म्हाकवेतील अजब प्रकार : जॅकवेल म्हाकवेत, पाणी कौलगेत; ग्रामस्थांना नाहक त्रास
दत्तात्रय पाटील -- म्हाकवे पिण्याच्या पाण्यासाठी ३० वर्षांत पाच योजना झाल्या. यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडूनही म्हाकवे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्या नशिबी दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेले जॅकवेल अपुरे पडत आहे.
काळम्मावाडी धरणातून पाणी वेदगंगेत न सोडल्यामुळे नदीतील पाणीपातळी अत्यंत कमी झाली असून, येथील जॅकवेल नदीकाठावर पाणीपातळीच्या समपातळीवर असल्यामुळे पाणी कौलगेत, तर जॅकवेल म्हाकवेत, अशी स्थिती बनली आहे. परिणामी, जॅकवेलमध्ये पाणी पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र पाणी योजना केली आहे.
ग्रामपंचायतीच्या स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण झाली; मात्र ग्रामस्थांना स्वच्छ पाण्यासाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनानेही येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निधीचा प्रवाह कायम ठेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा खटाटोपही केला. आजतागायत शासनाने पाच पाणी योजना व डझनभर कूपनलिका खुदाईसाठी तसेच पाणी साठवणुकीसाठी टाकी बांधण्यासाठी निधीही देऊ केला.
मात्र, खर्ची पडलेला निधी सत्कारणी लागला का? येथील ग्रामस्थांची तृष्णा भागविली गेली का? याचे सिंहावलोकन शासनाने केलेच नाही. केवळ निधी देण्याचेच काम केले.
१९७२ मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना गावच्या उत्तरेकडील बाजूस तलाव बांधून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न झाला. तेथून १९८२ मध्ये गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना झाली. मात्र, तलावात सध्या पाणीच नसल्याने ही योजना बंद अवस्थेत आहे.
त्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निधीतून दुसरी पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतून नदीतून थेट पाणी उपसा करून ते गावच्या उत्तरेकडील बाजूला पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बांधून त्यामध्ये सोडण्यात आले, तर तलावामध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी कालव्यावरून पाणी योजना करून ती तलावात सोडण्यात आली. त्यानंतर दलित वस्तीसाठी पुन्हा नव्याने पाणी योजना मंजूर करून तीही कार्यान्वित करण्यात आली.
परंतु, या चारही योजना कुचकामी ठरत असल्यामुळे ठिकठिकाणी डझनभर कूपनलिका खुदाईसाठी निधीही देण्यात आला. त्याचबरोबर गत दोन वर्षांपूर्वी पेयजल योजनेतून स्टेच गॅलरीसह नव्याने पाणीयोजना होण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची पाचवी योजना मंजूर करण्यात आली. मात्र, यातून सुमारे १९ लाख रुपये खर्च करून नदीमध्ये पाणी शुद्धिकरणाचे (स्टेच गॅलरी) काम झाले; परंतु हे काम निरुपयोगीच ठरले आहे.
तसेच महाजल योजनेतून सुमारे १० लाख रुपयांचा निधी खर्चून शोभेच्या इमारतीप्रमाणे जवळपास २० फूट उंचीचे जॅकवेल बांधले आहे; परंतु हे जॅकवेळ नदीत अथवा खोलीवर न करता वरचेवरच बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी कमी झाली की इतर विद्युतपंपांच्या आधारे नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी दिले जाते.
ग्रामस्थांवर तिहेरी भुर्दंड
नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी उचलण्यासाठी दोन्ही ठिकाणी स्वतंत्र विद्युत मोटारी आहेत, तर गावच्या उत्तरेकडील बाजूच्या तलावावर असणाऱ्या विद्युत पंपाचेही कनेक्शन चालूच आहे.
त्यामुळे तेथील वीज बिलही ग्रामपंचायतीला
भरावे लागत आहे. यासाठी प्रत्येक वर्षी ग्रामस्थांना सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये वीज बिलापोटी भरावे लागत आहेत. ही प्रशासनाची नियोजनशून्यताच म्हणावी लागेल.