भारत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियन, कोल्हापुरात जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:36 AM2023-07-05T11:36:13+5:302023-07-05T12:02:57+5:30
प्रत्येकाचे मोबाइल स्टेटस विजयाच्या शुभेच्छांनी भरून गेले
कोल्हापूर : सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताने कुवेतवर मात करत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविल्यानंतर कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींनी मंगळवारी रात्री उशिरा जल्लोष केला. बंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पराभव केला. यामुळे शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडू, फुटबॉलप्रेमींनी या विजयाचा आनंद साजरा करत रात्री उशिरा बाइक रॅली काढली. अनेकांनी तिरंगा ध्वजासह हा जल्लोष साजरा केला. प्रत्येकाचे मोबाइल स्टेटस विजयाच्या शुभेच्छांनी भरून गेले होते.
चुरशीच्या झालेल्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पेनल्टी शूटआउटमध्ये बलाढ्य कुवेतचा ५-४ असा पराभव केला. या थरारक विजयासह भारताने विक्रमी नवव्यांदा सॅफ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ सादर करत सामना थरारक केला. उपांत्य सामन्यातही पेनल्टी शूटआउटमध्येच बाजी मारताना भारताने लेबनॉनला ४-२ असे नमवले होते.
श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही बरोबरी कायम राहिली. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. यामध्ये भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगची भूमिका निर्णायक ठरली. पेनल्टी शूटआउटमध्येही दोन्ही संघांच्या पाच प्रयत्नानंतर ४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर सहाव्या प्रयत्नावर महेश सिंगने गोल करत भारताला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर कुवेतच्या खालीद इब्राहिमच्या किकचा अचूक अंदाज घेत गुरप्रीतने चेंडू यशस्वीपणे रोखला आणि भारताचे विक्रमी जेतेपद निश्चित झाले.