वैफल्यातून भारतने केले स्वत:चेच कुटुंब उद्ध्वस्त
By admin | Published: September 10, 2016 11:30 PM2016-09-10T23:30:42+5:302016-09-11T00:27:25+5:30
चौघींच्या खुनाने जत तालुका हादरला : संसाराची असफल कहाणी--आॅन दि स्पॉट रिपोर्ट
जयवंत आदाटे/संजयकुमार गुरव -- जत/डफळापूर
वारकरी संप्रदायातील माळकरी भारत इरकर याने शनिवारी कुडणूर येथे आई, पत्नीसह दोन मुलींची हत्या केल्याने जत तालुका हादरला. जमिनीच्या खटल्यातून आलेला आर्थिक तणाव, त्यातून आलेले वैफल्य की आणखी काही हे तपासावे लागणार आहे.
कुडणूर गाव जतपासून सुमारे पंचवीस व डफळापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावची लोकसंख्या दोन हजार आहे. गावातील नागरिकांचा डफळापूरशी सतत संपर्क असतो. हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत आहे. शेती, शेतमजूर व ऊसतोडणी कामगार म्हणून येथील नागरिक काम करतात. कुडणूर, शिंगणापूर, डफळापूर या तीन गावांदरम्यान हाक्के वस्ती आहे. येथील नागरिकांचा कुडनूर गावात समावेश असला तरी, दैनंदिन व्यवहार तीनही गावात चालतात. हाक्के वस्ती मुख्य रस्त्यापासून आडवळणी आहे. तेथे भारत कुंडलिक इरकर हा आई सुशीला कुंडलिक इरकर, पत्नी सिंधूताई भारत इरकर, मुलगी रूपाली, राणी, मुलगा म्हाळाप्पा व आकाश असे सातजण राहात होते.
भारतचे वडील कुंडलिक इरकर यांची येथे सुमारे ९० एकर जमीन होती. एकेकाळी ते परिसरातील मोठे जमीनदार होते. त्यांनी सहा लग्ने केली होती. त्यापैकी चार पत्नींचा मृत्यू झाला असून, त्यांना अपत्य नव्हते. जनाबाई (वय ७०) ही सावत्र आई व सुशीला (६५) ही सख्खी आई या दोघीजणी हयात आहेत. जनाबाई सांगली येथे विभक्त राहतात. शेतजमिनीच्या वादातून जनाबाई व भारत यांच्यात मागील तीस वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू आहे. त्यापैकी प्रत्येकवेळी थोडी-थोडी जमीन विकून भारत याने न्यायालयीन कामासाठी पैसे खर्च केले आहेत. जनाबाई यांना न्यायालयातून जमीन मिळाली आहे. सध्या भारत याच्या नावे आठ एकर व त्याच्या मुलाच्या नावे आठ एकर शेतजमीन आहे. अत्यल्प प्रमाणात पाऊस असल्याने शेतजमिनीतून कमी प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. जमीन विकून न्यायालयीन कामासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले तरीही निकाल आपल्याविरोधात गेला. न्यायालयात काढण्यात आलेले वॉरंट त्यामुळे घरदार, शेतजमीन व कुुटुंब असूनही फरारी होऊन भारत इरकर फिरत होता. अधून-मधून आणि रात्री-अपरात्री त्याचा घरी गुपचूप वावर असायचा. तो आर्थिक तणावाखाली होता. यातून त्याने आई, पत्नी आणि दोन मुलींचा एकाचवेळी खून केला. या प्रकारामुळे संपूर्ण जत तालुका हादरला आहे.
सुमारे दीड वर्षापूर्वी डफळापूर येथे काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण व त्यांची पत्नी शैलजा चव्हाण यांचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी याच परिसरात चारजणांचे हत्याकांड घडले. भारत इरकर याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्याची दोन मुले आता पाठीमागे राहिली आहेत. ‘मी स्वत: कोयत्याने वार करून चौघींची हत्या केली आहे’, असा जबाब भारत याने पोलिसांना दिला असला तरी, या हत्याकांडामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.