'सैनिकांच्या त्यागामुळेच भारत सुरक्षित'; हसन मुश्रीफ यांचे जवान राकेश निंगुरे यांना अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 07:08 PM2022-01-23T19:08:15+5:302022-01-23T19:08:22+5:30
'भारतमातेच्या रक्षणासाठी सैनिक घरदार व कुटुंबीयांना दूरवर सोडून, जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. '
म्हाकवे : सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित आहे, असे कृतज्ञता उदगार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. राकेश निंगुरे यांच्या कुंटुबियांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभे राहू असे अभिवचनही त्यांनी दिले. बानगे (ता. कागल) येथील चंदिगड (पंजाब) येथे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने तीन दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या जवान राकेश निंगुरे यांच्या अत्यंसंस्कारानंतर मुश्रीफ यांनी त्यांच्या कुंटुबियांचे सांत्ववन केले.
मंत्री मुश्रीफ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन जवान राकेश नींगुरे यांना अभिवादन केले. यावेळी मुश्रीफ म्हणाले, भारतमातेच्या रक्षणासाठी सैनिक घरदार व कुटुंबीयांना दूरवर सोडून, जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. त्यांच्या या खडतर त्यागामुळेच आम्ही भारतीय नागरिक सुरक्षित सुखाचे जीवन जगत आहोत. राकेश निंगुरे यांच्यासारख्या कर्त्या कुटुंबप्रमुखाच्या जाण्याने निंगुरे कुटुंबावर जो आघात झाला आहे, तो व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी स्वतः, माझे कुटुंबीय, राज्य सरकार व संपूर्ण महाराष्ट्र या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.