उच्च दाबाच्या परिस्थितीत यूव्हीपीईएस प्रदर्शित करणारा भारत एकमेव देश - गोपीनाथ
By संदीप आडनाईक | Published: November 6, 2022 10:41 PM2022-11-06T22:41:43+5:302022-11-06T22:42:45+5:30
स्तुती कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या सैफ डीएसटी सीएफसी विभागामध्ये १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत अत्याधुनिक विश्लेषणात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
कोल्हापूर : एपीपीईएस प्रदर्शित करणारा भारत हा जगातील सहावा तर उच्च दाबाच्या परिस्थितीत यूव्हीपीईएस प्रदर्शित करणारा एकमेव देश असल्याचे प्रतिपादन पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वैज्ञानिक डॉ. सी. एस. गोपीनाथ यांनी व्यक्त केले.
अल्ट्राव्हायोलेट फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी व्हॅलेन्स प्रदेशात आण्विक कक्षीय ऊर्जा निर्धारित करण्यासाठी, अल्ट्राव्हायोलेट फोटॉन्स शोषून घेतलेल्या रेणूंद्वारे उत्सर्जित केलेल्या फोटोइलेक्ट्रॉनच्या गतिज ऊर्जा स्पेक्ट्राच्या मोजमापाचा संदर्भ देते. या पातळीवर उच्च दाबाच्या परिस्थितीत यूव्हीपीईएस प्रदर्शित करणारा भारत हा एकमेव देश आहे, असे सांगून गोपीनाथ यांनी स्पष्ट केले की आपण ज्याला सभोवतालचा दाब म्हणजे ७६ एमएम एचजी म्हणतो, त्या एक बार दाबावर राहतो. जवळच्या वातावरणीय दाबावर यूव्हीपीईएस प्रदर्शित केला जातो. एम्बियंट प्रेशर फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे एपीपीईएस प्रदर्शित करण्यामध्येही भारत हा जगातील सहावा देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्तुती कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या सैफ डीएसटी सीएफसी विभागामध्ये १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत अत्याधुनिक विश्लेषणात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या कार्यशाळेतील बारावे पुष्प गुंफण्यासाठी डॉ. सी. एस. गोपीनाथ यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी 'एक्सपीएस' या उपकरणाबद्दल नवोदित संशोधकांना माहिती करून दिली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विज्ञानाची एक महत्त्वाची शाखा रसायनशास्त्र या विषयाच्या अनेक उपशाखांवर संशोधन केले जाते.
पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करून त्याची उपयुक्तता ठरवण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट स्पेक्ट्रोस्कॉपी उपयुक्त असल्याचे मत कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात रसायनशास्त्र विभागाचे प्रा. एस. डी. डेळेकर यांनी व्यक्त केले. ते 'अल्ट्रा-व्हायोलेट स्पेक्ट्रोस्कॉपी' या विषयी मार्गदर्शन केले. या उपकरणाच्या माध्यमातून विविध गुणधर्मांचा अभ्यास करून या पदार्थांची किंवा नॅनो-पदार्थाची उपयुक्तता कशासाठी आहे, याविषयी माहिती दिली. व्याख्यानमालेच्या या दोन्ही सत्रांचे आयोजन प्रा. राजेंद्र सोनकवडे यांच्यासह 'स्तुती' टीमने केले होते. दुपारच्या सत्रामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना किल्ले पन्हाळाची सफर घडविली. विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या अवकाश संशोधन केंद्राला सर्वांनी भेट दिली. येथे त्यांनी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे अवकाश निरीक्षण केले आणि पन्हाळ्यावरील जैवविविधतेचा आनंद घेतला.