भारत देशा, जय बसवेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:28 AM2018-01-29T00:28:21+5:302018-01-29T00:29:25+5:30

India, Jai Basashada | भारत देशा, जय बसवेशा

भारत देशा, जय बसवेशा

googlenewsNext


कोल्हापूर : बसवेश्वरांच्या छायाचित्रासह फडकणारे भगवे झेंडे, ‘मी लिंगायत, लिंगायत स्वतंत्र धर्म’ लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे स्कार्फ ‘जगनज्योती महात्मा बसवेश्वर की जय,’ ‘मी लिंगायत, आमचा धर्म लिंगायत’च्या घोषणा, हजारो शरण-शरणींची उपस्थिती आणि ‘भारत देशा, जय बसवेशा’चा गजर असे अनोखे वातावरण रविवारी दसरा चौकाने अनुभवले.
अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत स्वतंत्र धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी म्हणून रविवारी दुपारी महामोर्चा काढण्यात आला. त्याआधी दसरा चौकामध्ये सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. या मोर्चाचे प्रमुख केंद्रच दसरा चौक असल्याने साहजिकच या ठिकाणी वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूला भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळी दहानंतर लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने दसरा चौकामध्ये जमू लागले. तिथे येताच ‘मी लिंगायत’ लिहिलेल्या टोप्या डोक्यावर चढू लागल्या. व्यासपीठावर एकेका मान्यवराचे आगमन होऊ लागले.
पाठिंब्याची भाषणे सुरू झाल्यानंतर घोषणा वाढू लागल्या. ‘बसवपीठा’वरून आवाहन केल्यानंतर हात वर करून घोषणांच्या आवाजाची पातळी वाढू लागली. बसवेश्वरांचे चित्र असलेले भगवे झेंडे फडकू लागले. त्यामुळे मोर्चा अधिक भारदस्त वाटू लागला. उन्हातही महिला आणि पुरुष, युवक-युवतींनी रस्त्यातच बैठक मारली होती. वक्त्यांच्या भाषणाला टाळ्या पडत होत्या. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही. दिलेल्या सूचनांचे पालन करीत सर्वांनीच शिस्तपालनाचे दर्शन या ठिकाणी घडविले.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे ठराव
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभांमध्ये लिंगायत या स्वतंत्र धर्माला संवैधानिक दर्जा मिळावा, असा ठराव केला होता. अशा गावांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली. अनेक गावांनी अशा स्वरूपाचे केलेले ठराव संयोजकांकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच पाठिंबा दिलेल्या मान्यवरांचीही नावे जाहीर करण्यात आली.

Web Title: India, Jai Basashada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.