रेंदाळमध्ये उभारणार ‘भारत राखीव बटालियन’
By admin | Published: October 25, 2015 12:49 AM2015-10-25T00:49:17+5:302015-10-25T01:09:30+5:30
२८ आॅक्टोबरला बैठक : ७५ एकर जागेची मागणी; मार्ग निघण्याची शक्यता
एकनाथ पाटील / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन-३’ची शासनाने निर्मिती केली; परंतु या बटालियनचा गेल्या पाच वर्षांपासून जागेअभावी मुक्काम दौंड (जि. पुणे) येथे आहे. दरम्यान, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील जागा मंजूर करण्यासाठी बटालियन प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे पंधरा दिवसांपूर्वी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये प्राधान्याने २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. या संदर्भात प्रशासनाची ग्रामस्थांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. ही जागा निश्चित करण्यासाठी दि. २८ आॅक्टोबरला रेंदाळ ग्रामपंचायतीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, प्रांताधिकारी, तहसीलदार व बटालियनचे समादेशक यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित असलेली कर्तव्ये परिणामकारकरीत्या पार पाडता यावी, याकरिता ‘भारत राखीव बटालियन-३’ची निर्मिती ८ डिसेंबर २०१० रोजी झाली. राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर होतो.
मजले-तमदलगेच्या जागेत अडचणी
बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ही जागा सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत पूर्णत: वनसंज्ञा लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण होऊन मुख्यालय उभारणीस उशीर होत आहे. सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’ कार्यरत असून यामध्ये एकूण ७५० अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावीत आहेत; परंतु जागेअभावी या अधिकारी व कर्मचारी यांना कोल्हापूरऐवजी गट क्र. ५ व ७ दौंड (जि. पुणे) येथे ठेवणे भाग पडत आहे.
गावच्या विकासामध्ये भर
राज्य राखीव पोलीस बल गटाची निर्मिती ज्या ठिकाणी होते, तेथील रोजगार, स्थानिक बाजारपेठ, रुग्णालये, शाळा, कॉलेज, आदी सुविधांची आवश्यकता पडत असल्याने त्यात पर्यायाने गावाच्या विकासामध्ये, प्रगतीमध्ये व तसेच त्यांच्या महसुलामध्ये भर पडते. राज्यात विविध ठिकाणी १५ राज्य राखीव पोलीस बल गट कार्यरत असून, तेथील गावांचा आढावा घेतल्यास गटनिर्मितीमुळे त्यांना झालेल्या वाढीचा फायदा लक्षात येईल.
असे साकारणार मुख्यालय
या गटामध्ये एक हजारपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कुटुंबीयांसह राहणार असल्याने येथे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची भर पडणार आहे. मुख्यालयाची निर्मिती होताना या जागेमध्ये मुख्यत: कवायत मैदान, प्रशासकीय इमारत, कंपनी कार्यालय, शस्त्रास्त्रे व दारूगोळा ठेवण्याकरिता सुरक्षित जागा, इमारत, मोटार परिवहन विभाग व त्यांचे पेट्रोल-डिझेल पंप या व्यतिरिक्त कर्मचारी आणि अधिकारी यांची निवासस्थाने, आदींची उभारणी करावी लागणार आहे. गटनिर्मितीवेळी तसेच दैनंदिन कामकाजावेळी गट मुख्यालयात उपलब्ध असलेल्या या राखीव कर्मचाऱ्यांकडून वृक्षारोपण व त्यानंतरचे वृक्षसंवर्धन व निगा होत असल्याने गट मुख्यालय हे नेहमीच हिरव्यागार गर्द झाडीने युक्त होऊन तिथे पर्यावरणपूरक वातावरण असते.