'भारत- रोम' व्यापारी संबंध; कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयातील 'या' आठ वस्तू गेल्या सातासमुद्रापार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:04 PM2023-12-20T12:04:33+5:302023-12-20T12:05:15+5:30
कोल्हापुरचा ग्रीक आणि रोम या देशांशी असणारा इतिहासातील व्यापारी संबंध या वस्तूंमुळे पुन्हा समोर आला
दुर्वा दळवी
कोल्हापूर: उत्खनन करताना ज्या वस्तू सापडतात त्यावरून इतिहासातील अनेक बाबी प्रकाश झोतात येतात. सातासमुद्रापार पार असणाऱ्या देशांशी महाराष्ट्रातील कोल्हापूरचा व्यापारी संबंध होता याचे पुरावे देणाऱ्या वस्तू ब्रह्मपुरी टेकडीवरील सन १९४५ - १९४६ साली करण्यात आलेल्या उत्खननात आढळलेल्या होत्या. त्यातील आठ महत्त्वाच्या वस्तू टाऊन हॉल संग्रहालयात असून त्या आता थेट न्यूयॉर्क-कोरियाला प्रदर्शनाकरिता पाठवण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या सहयोगाने दिल्ली नॅशनल म्युझियम यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयातील आठ वस्तू नेण्यात आल्या आहेत. 'अर्ली बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया' या विशेष प्रदर्शनाकरिता या वस्तू लोन तत्वावर करार करून सातासमुद्रापार नेण्यात आल्या आहेत. कोल्हापुरचा ग्रीक आणि रोम या देशांशी असणारा इतिहासातील व्यापारी संबंध या वस्तूंमुळे पुन्हा समोर आला आहे.
न्यूयॉर्कच्या मेट म्युझियममध्ये या आठ वस्तू प्रदर्शनाकरिता १७ जुलै २०२३ ते १३ नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वस्तू उत्तर कोरियातील नॅशनल म्युझियममध्ये २२ डिसेंबर २०२३ ते १४ एप्रिल २०२४ पर्यंत प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचा कालावधी संपल्यावर पुन्हा ह्या वस्तू कोल्हापुरात येणार आहेत.
या आठ वस्तू कोल्हापुरातून परदेशात गेल्या
सहा इंचाची ग्रीक समुद्रदेवतेची अर्थात 'पोसायडमन'ची पंचधातूची मूर्ती, खेळण्यातील धातूची बैलगाडी, हत्तीवरील स्वार, जैनधर्मीयांची संकेत चिन्हे, वॉटर व्हेसल पॉट, रोमन पदक, मेटल रिंग या आठ प्रकारच्या कलावस्तू कोल्हापुरातून पहिल्यांदाच भारताबाहेर गेल्या आहेत. ज्या न्यूयॉर्क येथील प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या ज्या आता कोरियात नेण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट
इसवी सन पूर्व काळात कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा थेट रोमन आणि ग्रीक राष्ट्रांशी व्यापारी संबंध होता हे या वस्तूंवरून अधोरेखित होते. कोल्हापुरातील अनमोल ठेवा सातासमुद्रापार जाणे ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. - उदय सुर्वे, सहायक अभिरक्षक, टाऊन हॉल संग्रहालय