भारतीय बेसबॉल संघात कोल्हापूरची गिरिजा....
By Admin | Published: August 14, 2016 12:45 AM2016-08-14T00:45:34+5:302016-08-14T01:02:58+5:30
राज्यातून एकमेव खेळाडू : द. कोरियातील विश्वचषक स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर : दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या विश्वचषक बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात कोल्हापूरच्या गिरिजा सुनील बोडेकर हिची निवड झाली. गिरिजा ही कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने हे यश मिळविले.
कदमवाडी येथे राहणारी गिरिजा शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिची बेसबॉल खेळाची ओळख झाली. क्रीडाशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अल्पावधीतच या खेळात प्रावीण्य मिळविले. जिल्ह्णातील, विभागीय, राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तिने यशस्वी कामगिरी केली आहे.
बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून तिची या स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. गिरिजा कमला विद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिकत आहे. तिच्या आई सुधा गृहिणी आहेत, तर वडील सुनील एका शाळेत लिपिक आहेत. तिला यासाठी या उभयतांचे पाठबळ आणि जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष धनंजय महाडिक, नगरसेवक नाना कदम यांचे प्रोत्साहन लाभले. (प्रतिनिधी)
नियमित सरावातील सातत्य हेच माझ्या निवडीमागील रहस्य आहे. वेगळे काहीतरी करून दाखविण्याची संधी मला मिळाली आहे. तिथे दमदार कामगिरी करून भारतीय संघास पदक मिळवून देणारच.
- गिरिजा बोडेकर
भारतीय संघाच्या निवड चाचणीत महाराष्ट्रातून चार मुलींचा सहभाग होता. त्यामधून एकमेव गिरिजाची निवड झाली, हा माझ्यासाठी सर्वांत मोठा आनंद आहे. तिची घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केल्यास ती यशस्वी कामगिरी करेल.
- राजेंद्र बनसोडे, प्रशिक्षक