म्हाकवेत तिरंगी लढतीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:48+5:302020-12-24T04:20:48+5:30
म्हाकवे : कागल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या म्हाकवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जुना ...
म्हाकवे : कागल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या म्हाकवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जुना मंडलिक व घाटगे गट तसेच विविध पक्षातील नाराजांनी एकत्रित येऊन आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. १३ जागांसाठी मतदान होत असून नाराजीचा फटका कोणाला बसणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वर्षांपासून मंडलिक-घाटगे असाच संघर्ष राहिला आहे. गत निवडणुकीत मंडलिक गटाने संजय घाटगे गटाशी हातमिळवणी केली होती. तर एकाकी झुंज देणाऱ्या मुश्रीफ गटाने बाजी मारली होती.
मुश्रीफ गटाचे शिलेदार सिद्राम पाटील यांचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात हा गट निवडणुकीला सामोरा जात आहे. तर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी सवतासुभा कायम ठेवत अन्य नाराज तसेच इच्छुकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी करून आवाहन देण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. राजे गटातही उभी फूट पडली आहे. यातील बाजार समितीच्या माजी उपाध्यक्षा आशालता पाटील यांचे पती ए. डी. पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.
दरम्यान, मंडलिक कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले व मुश्रीफ गटाचे माजी उपसरपंच रमेश पाटील यांची युती झाली आहे. तर संजय घाटगे गटाचे ए. वाय. पाटील व राजे गटाचे धनंजय पाटील यांची आघाडी निश्चित मानली जात असून यंत्रणा कामाला लागली आहे. सध्या गावात भेटीगाठी घेत छुप्या प्रचाराला वेग आला आहे.
............
युवा ब्रिगेड कार्यमग्न...
तिन्ही आघाड्यांतून युवकांनाच उमेदवारी देण्याचा अजेंडा दिसत आहे. त्यामुळे बँक खाते, विविध दाखले जमा करण्यासाठी येथील युवा कार्यकर्त्यांची पळापळ सुरू आहे.