व्यक्तिगत जनसंपर्कच निर्णायक

By admin | Published: August 18, 2015 11:53 PM2015-08-18T23:53:46+5:302015-08-18T23:53:46+5:30

गट, पक्षापेक्षा व्यक्ती पाहून मतदान : उच्च मध्यम, मध्यम वर्ग मतदारांची संख्या जास्त--प्रभाग क्र. १८ महाडिक वसाहत

Individual Public Relations Critical | व्यक्तिगत जनसंपर्कच निर्णायक

व्यक्तिगत जनसंपर्कच निर्णायक

Next

कोल्हापूर : जुन्या रुईकर कॉलनी प्रभागातील काही भाग, पाटोळेवाडी-कदमवाडी प्रभागातील पाटोळेवाडी, लांबोरे वसाहत, सीमा अपार्टमेंट, मेनन बंगलो, ग्रीन पार्क, शिवराज कॉलनी, लिशां हॉटेलसमोरील भाग, भीमनगर कॉलनी, युनिक पार्क आणि टेंबलाई मंदिर प्रभागातील काही गल्ल्या मिळून महाडिक वसाहत हा प्रभाग क्रमांक १८ बनलेला आहे. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वसाहत असलेला हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुला आहे. पक्षापेक्षा उमेदवाराकडे पाहून मतदान करण्याचा प्रघात असलेल्या या प्रभागात व्यक्तिगत जनसंपर्काच्या जोरावरच निवडणुकीत बाजी मारता येणार आहे़ गेल्या दोन निवडणुकींत असाच कल दिसला आहे़ गतनिवडणुकीत रुईकर कॉलनी प्रभागातून राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक प्रकाश पाटील यांच्याकडून अवघ्या १५० मतांनी पराभूत झालेल्या प्रमोद देसाई यांच्या पत्नी शीतल देसाई, माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या स्नुषा सीमा कदम, जुन्या पाटोळेवाडी-कदमवाडी प्रभागाच्या नगरसेविका रेखा आवळे या इच्छुक आहेत. जुन्या प्रभाग रचनेतील टेंबलाई मंदिर या प्रभागातून राष्ट्रवादीचे उमेदवार रशीद बारगीर यांच्याकडून
५० मतांनी निसटता पराभव झालेले राजेंद्र पाटील यांच्या पत्नी वैष्णवी पाटीलही इच्छुक आहेत.
मराठा समाजाची जास्त लोकसंख्या, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती ही या प्रभागाची खास वैशिष्ट्ये आहेत़ सुशिक्षित मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे गट-तट-पक्ष यांपेक्षा व्यक्ती पाहूनच मतदान करण्यावर येथील मतदार प्राधान्य देतात, असा अनुभव आहे़ खुद्द उमेदवारांनाही याची जाणीव आहे़ मंडळांची संख्या तर चार-पाचच्या आसपास आहे़ त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांशी व्यक्तिगत स्तरावर सतत संपर्क साधण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे़
पाटोळेवाडी, लिशां हॉटेल समोरील भाग, युनिक पार्क हा नवीन प्रभागरचनेत रस्त्याखालील भाग महाडिक वसाहतीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे या ठिकाणची मते निर्णायक ठरणार आहेत़ या भागात एकूण मतदानांपैकी सुमारे चाळीस टक्के मतदान असल्यामुळे इथली रसद मिळविण्यासाठी उमेदवार चाचपणी करीत आहे़ गत निवडणुकीत रुईकर कॉलनीतून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले प्रमोद देसाई यांचा जनसंपर्क चांगला आहे़ या प्रभागातून दोनदा निवडणूक लढविल्याचा लाभ पथ्यावर पाडून घेण्यास देसाई यांनी कंबर कसली आहे़
विद्या कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, महाडिक वसाहतीचा काही भाग, प्रज्ञापुरी यांसह नवीन प्रभागरचनेत आलेल्या उर्वरित रुईकर कॉलनीतील साठ टक्के मते, तर रस्त्याखालील पाटोळेवाडीसह उर्वरित भागाची मते उमेदवाराचा निकाल ठरविणार आहेत़
महाडिक घराण्याचे पाहुणे असलेल्या कदम कुटुंबीयांतील सीमा कदम या ताराराणी आघाडी-भाजपमधून निवडणूक लढविणार आहेत. तिकीट पक्के असल्यामुळे कदम कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. भाजपशी हातमिळवणी, राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा गृहीत धरून कदम कुटुंबीयांनी आतापासूनच जनसंपर्कावर भर दिला आहे़
जुन्या प्रभागरचनेत पाटोळेवाडी-कदमवाडी या प्रभागातून विजय संपादन केलेल्या रेखा आवळेही महाडिक वसाहत प्रभागातून राष्ट्रवादीमधून इच्छुक आहेत़ तिकीट मिळाल्यास आवळेंना रुईकर कॉलनीतील मतांसाठी झगडावे लागणार आहे़ कदम यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीची रसद किती मिळते, यावर गणिते अवलंबून आहेत़ गत निवडणुकीत रेखा आवळे यांनी पाटोळेवाडीतून साडेसहाशे मतांनी विजय संपादन केला होता़
राजेंद्र पाटील यांनी पत्नी वैष्णवी पाटील यांच्यासाठी तयारी सुरू केली आहे़ शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी पाटील यांनी जनसंपर्कावर भर दिला आहे़ महाडिक वसाहतीमध्ये टेंबलाई मंदिर प्रभागातील आलेला काही भाग, कट्टर कार्यकर्ते ही पाटील यांची जमेची बाजू आहे़


असा आहे प्रभाग
पाटोळेवाडी, महाडिक वसाहत, कोल्हापूर आॅक्सिजन, स्वामी समर्थमंदिर, होंडा शोरूम, रुईकर कॉलनी ग्राऊंड, शिंदे रेसिडेन्सी, कर्मवीर शाळा, डॉ़ गुंडा व मेनन बंगला, लांबोरे सोसायटी, सीमा अपार्टमेंट व दत्तमंदिर, हॉटेल येळवन व कुटुंब कल्याण केंद्र क्ऱ ६, दवाखाना, विद्या कॉलनी, परांजपे स्कीम, साने गुरुजी कॉलनी़


निर्णायक मतदान
पाटोळेवाडी, लांबोरे वसाहत, सीमा अपार्टमेंट, ग्रीन पार्क, शिवराज कॉलनी, लिशां हॉटेलसमोरील भाग, भीमनगर कॉलनी, युनिक पार्क हा रस्त्याखालील भाग निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणारा आहे़

Web Title: Individual Public Relations Critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.