भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती : काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:07 PM2019-03-01T14:07:38+5:302019-03-01T14:11:57+5:30
काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
भारताचे नंदनवन असलेले काश्मीर एकदा तरी पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मार्च ते जुलै या कालावधीत विविध टुर कंपन्यांकडून काश्मीर सहली काढल्या जातात. कोल्हापुरातून वर्षाकाठी जवळपास १० ते १५ नागरिक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. त्यांचे बुकिंग सहा महिने आधीच झालेले असते.
यंदाच्या वर्षीची सहल २० मार्चपासून सुरू होणार होती. मात्र पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला, त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या युद्धजन्य व तणावपूर्ण स्थितीमुळे टूर कंपन्यांनी हा दौरा रद्द केला आहे. शिवाय काश्मीरला काही कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी तेथे जाणाऱ्या विमानांचे तिकीट रद्द केले आहे.
काश्मीरचे अर्थकारण मुख्यत: पर्यटनावर चालते; त्यामुळे तेथील सरकारकडूनही पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र भारताचे स्वर्ग असलेले हे राज्य सध्या सर्र्वांत संवेदनशील बनले आहे. जवानांवरील हल्ल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत; शिवाय मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या दोन्ही कारणांमुळे काश्मीरचा ठरलेला दौरा रद्द करण्यात आला आहे.
दुबईहून पुढचा प्रवास
या तणावपूर्ण स्थितीमुळे भारतातून अन्य देशांना जाणाऱ्या विमानांचा मार्ग वळविण्यात आला आहे. युरोप, लंडन, स्पेनसारख्या अनेक देशांमध्ये ही विमाने पाकिस्तानमधून जातात. आता मात्र ही विमाने पाकिस्तानऐवजी दुबईमार्गे वळविण्यात आली आहे.
शुल्क रद्दची मागणी
काश्मीरमधील सध्याच्या वातावरणामुळे देशभरातील नागरिकांकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात विमानांची तिकिटे रद्द केली जात आहेत. काश्मीरमध्येच नव्हे तर अन्य देशांत जाणाऱ्या नागरिकांनीही आपला दौरा थांबविला आहे. मात्र बुकिंग केलेले तिकीट रद्द करताना शुल्क आकारले जाते. ही रक्कम तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंत असते. ट्रॅव्हल एजंट इंडिया असोसिएशनने विमान कंपन्यांकडे सद्य:स्थितीत हे शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
काश्मीरचे सौंदर्य आणि बर्फ पाहण्यासाठी नागरिक तेथे जातात. सध्याच्या स्थितीत हे शक्य नसल्याने कोल्हापुरातील टूर कंपन्यांनी काश्मीरचा दौरा रद्द केला आहे. वातावरण निवळल्यानंतर पुन्हा सहली सुरू होतील.
- बी. व्ही. वराडे, ट्रेड विंग्ज