औद्योगिक क्षेत्र, शिक्षण संस्थांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:54 PM2018-02-25T23:54:55+5:302018-02-25T23:54:55+5:30
कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
शिक्षण संस्था आणि उद्योजक यांच्यात आंतरक्रिया व्हावी तसेच या दोहोंच्यात माहिती आणि ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले होते. याचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून झाले. यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील एक चांगली संधी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शनमधून निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातला चांगला अनुभवही प्राप्त होण्यास मदत होणार आहे. या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थी चांगले करिअर करू शकतील.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, सध्या औद्योगिक क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कुशल मनुष्यबळ मिळत नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. योग्य तांत्रिक ज्ञान उपलब्ध होत नाही. अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध होत नाहीत. अभ्यासक्रमात गॅप असतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले ज्ञान मिळत नाही. विद्यार्थी लाईव्ह प्रोजेक्ट करत नाहीत. कामाच्या अनुभवाची कमतरता, पायाभूत सुविधांची कमतरता असते. यासाठी उद्योजक, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले पाहिजेत. या उद्देशानेच या इंडस्ट्री इन्स्टिट्यूूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले आहे.
यावेळी गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंह पवार यांनी, उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असते. अनेक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळत नाही. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपमुळे या माध्यमातून उद्योग क्षेत्राला उपयुक्त असलेले कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.
यावेळी फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी, कारखानदारांना आधुनिक ज्ञानाची गरज आहे. ती डी. वाय. पाटील ग्रुपकडून नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्योजक सचिन मेनन, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, उद्योजक अजयसिंह देसाई यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सचिन मेनन, राजीव पारीख, श्रीकांत दुधाणे, आदी उपस्थित होते.