औद्योगिक क्षेत्राला मनुष्यबळ पुरविणार
By admin | Published: May 18, 2016 12:40 AM2016-05-18T00:40:37+5:302016-05-18T00:44:59+5:30
देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठ-इंडो जर्मन टूल रूम यांच्यात सामंजस्य करार; आवश्यक शिक्षण देणार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्राला इंडो जर्मन टूल रूमच्या सहकार्याने पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल्स रूम (आयजीटीआर) यांच्यात सामंजस्य मंगळवारी करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहातील कार्यक्रमास ‘आरजीटीआर’चे व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. अजित थेटे, जी. एस. कुलकर्णी, गोपाळ बेलूरकर प्रमुख उपस्थित होते.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘आयजीटीआर’च्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण विद्यापीठामध्ये दिले जाईल. त्याचे प्रशिक्षण आयजीटीआर येथे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देण्यात येईल. उद्योग व्यवस्थेने कोणत्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे ते विषद करणे आवश्यक आहे.
यावेळी हेमंत कापसे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविणे हा संबंधित सामंजस्य कराराचा एक भाग आहे. त्यासह उद्योग क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानामुळे सातत्याने होणारे बदल हे तळागाळांतील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल. विद्यार्थ्यांना विविध तंत्रकौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास उद्योजक मोहन घाटगे, प्रताप पुराणिक, राज पाटील, आदी उपस्थित होते. उद्योग तंत्र संस्था आंतरक्रिया कक्षाचे समन्वयक हर्षवर्धन पंडित यांनी प्रास्ताविक केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे समन्वयक अजित कोळेकर यांनी आभार मानले.
प्रशिक्षण द्यावे
या कराराअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांतील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कौशल्य देण्यावर भर द्यावा तसेच सध्या कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांना प्रशिक्षण देण्याचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली.
या करारांतर्गत विद्यापीठातील संशोधकांसाठी औरंगाबाद येथे प्रगत संशोधनाची सोय, नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य प्रशिक्षण व विकास, आदी संयुक्त प्रकल्पांवर काम केले जाणार आहे, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.