‘विकेंड लॉकडाऊन’मध्ये जिल्ह्यातील उद्योग सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:34+5:302021-04-08T04:23:34+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शनिवारी, रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. उत्पादन ...

The industry in the district will continue in ‘Weekend Lockdown’ | ‘विकेंड लॉकडाऊन’मध्ये जिल्ह्यातील उद्योग सुरू राहणार

‘विकेंड लॉकडाऊन’मध्ये जिल्ह्यातील उद्योग सुरू राहणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शनिवारी, रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. उत्पादन क्षेत्रासाठी हा लॉकडाऊन असणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, गोकूळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील २२५० उद्योग सुरू राहणार आहेत. त्यासह आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या असोसिएशनकडून त्यांच्या सभासदांना देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी बसलेल्या कोरोनाच्या तडाख्यातून जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र सध्या बऱ्यापैकी पूर्वपदावर आले आहे. फौंड्री आणि ॲटोमोबाइल हब असलेल्या येथील उद्योगांकडील ऑर्डर्स वाढल्या आहेत. त्यातच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने उद्योजक, कामगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनमध्ये उत्पादन क्षेत्राला सवलत दिल्याने उद्योगक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. उद्योजक, कामगारांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, आदी नियमांचे पालन काटेकोरपणे करून उद्योगचक्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विकेंड लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील लहान,मोठे असे २२५० उद्योग, कारखाने सुरू राहणार आहेत.

असोसिएशनचे अध्यक्ष म्हणतात?

उत्पादन क्षेत्रासाठी विकेंड लॉकडाऊन लागू नाही. याबाबतच्या शासन आदेशाची माहिती आणि कोरोना नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना सभासदांना दिल्या आहेत. शिरोली एमआयडीसीतील उद्योग, कारखाने शनिवारी, रविवारी सुरू राहतील.

-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅक.

उद्योजकांकडील कामाची स्थिती सध्या चांगली आहे. शासन नियमांचे पालन करून शनिवारी, रविवारी उद्योग सुरू राहतील. कामगारांना वॅक्सिन देण्याबाबत जागा उपलब्ध करून देण्यास ‘गोशिमा’ तयार आहे.

-श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा.

विकेंड लॉकडाऊनमध्ये औद्योगिक वसाहतींमधील कारखाने सुरू ठेवले जाणार आहेत. प्रत्येक कामगारांना ओळखपत्र देण्यासह कोरोनाबाबतची आवश्यक दक्षता घेण्याची सूचना आम्ही सभासद उद्योजकांना केली आहे.

-गोरख माळी, अध्यक्ष, मॅक.

चौकट

कामगारांना ओळखपत्र देण्याची गरज

या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश कामगार हे जिल्ह्यातील विविध परिसरातील ग्रामीण भागातून येतात. शनिवारी, रविवारी लॉकडाऊनमध्ये कामावर येण्यासाठी त्यांना ते कामावर असलेल्या उद्योग, आस्थापनांनी ओळखपत्र देणे आवश्यक आहे.

औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी

वसाहत उद्योग कामगार

शिरोली १००० ३००००

गोकूळ शिरगाव ८०० १५०००

कागल-हातकणंगले ४५० ४००००

Web Title: The industry in the district will continue in ‘Weekend Lockdown’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.