डीकेटीईला इंडस्ट्री लिंक्ड इन्स्टिट्यूट पुरस्कार
By Admin | Published: December 8, 2015 12:48 AM2015-12-08T00:48:24+5:302015-12-08T00:50:18+5:30
इचलकरंजीसाठी गौरव : संस्थेचा आणखी लौकिक वाढला : आवाडे
इचलकरंजी : आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन व कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री यांच्यावतीने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँड इन्स्टिट्यूटला ‘इंडस्ट्री लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट २०१५’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला. या सर्वेक्षणात देशातील २१६१ महाविद्यालयांनी भाग घेतला होता, अशी माहिती डीकेटीई इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.दिल्ली येथे ‘ग्लोबल युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री कॉँग्रेस : ग्लोबल हायर एज्युकेशन समेट २०१५’ ही परिषद झाली. त्यामध्ये टाटा अॅवार्ड फॉर बेस्ट इंडस्ट्री लिंक्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हा देश पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार डीकेटीईला देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, टाटा केमिकलचे कार्यकारी व्यवस्थापक रामकृष्णन मुकुंदन, नौशाद फोर्बस् व विजय थंडानी यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी स्वीकारला.
या सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये सुरुवातीला २१६१ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला असला तरी पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणानंतर ९०१ महाविद्यालये पात्र ठरली होती.
गेले सहा महिने विविध पातळीवर महाविद्यालयांचे सर्वेक्षण सुरू होते. त्यामध्ये अद्ययावत शिक्षण, औद्योगिक सल्ला, इंडस्ट्री सर्व्हिसेस, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यातील गुणोत्तरता, औद्योगिक संस्थांशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार, संशोधन, अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्लेसमेंट व उद्योग जगताशी असलेले संबंध यांचे विश्लेषण अशा मुद्द्यांवर या सर्वेक्षणामध्ये विचार करण्यात आला.
अखेरच्या टप्प्यात चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. मीनालक्ष्मी सुंदरम् व थरमॅक्सचे सरव्यवस्थापक एम. एस. रानडे यांनी महाविद्यालयास भेट दिली व महाविद्यालयामध्ये गेल्या ३३ वर्षांत झालेल्या वस्त्रोद्योग विभागाकडील शंभर टक्के प्लेसमेंट या मुद्द्यावर ते प्रभावित झाले, असे सांगून आवाडे म्हणाले, देश पातळीवरील प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाल्यामुळे डीकेटीईचा लौकिक आता आणखीनच वाढला आहे. डीकेटीईचे यश उल्लेखनीय आहे.
पत्रकार परिषदेसाठी डीकेटीईचे संचालक प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, वस्त्रोद्योग विभागाचे प्रमुख प्रा. यु. जे. पाटील, आदींसह अन्य संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)