खेळाडूंसाठी उद्योगजगताचे ‘सामाजिक उत्तरदायित्त्व’
By admin | Published: January 2, 2017 12:29 AM2017-01-02T00:29:07+5:302017-01-02T00:29:07+5:30
क्रीडासंवर्धन, संस्कृतीची जोपासना : अर्थसाहाय्य, विमा संरक्षण, संघ, खेळाडूंना दत्तक घेणार
सचिन भोसले ल्ल कोल्हापूर
समाजातील विविध क्षेत्रांना आर्थिक मदत व विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे बळ देण्याच्या उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर)चा क्रीडाक्षेत्रालाही लाभ करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योजकांचा पैसा खेळ आणि खेळाडूंवर खर्च करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातून चांगले खेळाडू देशाला मिळणार आहेत.
केंद्र सरकारने कंपनी अधिनियम २०१३ कलम १३५ नुसार पाच अब्जांपेक्षा निव्वळ मूल्य असलेल्या व १० अब्जांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या किंवा पाच कोटी रुपये निव्वळ नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील दोन टक्के रक्कम सामाजिक कार्याकरिता वापरणे बंधनकारक केले आहे. कें द्राने यात अधिसूचना काढत ग्रामीण खेळ, राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त खेळ, पॅरॉलिम्पिक खेळ आणि आॅलिम्पिक खेळाच्या संवर्धनासाठी पायाभूत क्रीडा सुविधा प्रकल्प व त्यांची देखभाल यांचाही समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला अनुसरून राज्याच्या क्रीडा धोरणातही सुधारणा केली असून, त्यात ‘सीएसआर’ अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा समावेश केला आहे. त्यात क्रीडासंवर्धन, संस्कृतीची जोपासना केली जाणार आहे.
याशिवाय क्रीडासंकुलाला अद्ययावत साहित्य उपलब्ध करणे, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, निपुणता केंद्र, क्रीडा वैद्यकीय केंद्र, देखभाल व दुरुस्ती, विविध खेळ स्पर्धा आयोजन, उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी अर्थसाहाय्य करणे, संघ किंवा खेळाडूंना दत्तक घेणे यांचा समावेश आहे.
विशिष्ट आहार, त्यांना खेळताना झालेल्या दुखापतीसाठी विमा संरक्षण, खेळाडूंना देशासह परदेशांतही पाठविण्यासाठी तरतूद
या धोरणात आहे. पारितोषिक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती व प्रशिक्षकांना प्रशिक्षण वाढीसाठी प्रोत्साहन देणे, आदींची समावेश आहे.
समन्वयासाठी जिल्हा पातळीवर समिती
‘सीएसआर’अंतर्गत कंपन्यांचा सहभाग वाढण्यासाठी प्रकल्पांचा समन्वय आणि नियंत्रण याकरिता राज्य पातळीवर शालेय शिक्षण व क्रीडा खात्याचे प्रधान सचिव यांच्या, तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे.