अपात्र शिधापत्रिकाधारक आरोग्य योजनांपासून राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:24+5:302021-02-06T04:41:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील बीपीएल, अंत्योदय, केशरी व शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी मोहीम सुुरू करण्यात आली असून त्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील बीपीएल, अंत्योदय, केशरी व शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी मोहीम सुुरू करण्यात आली असून त्यात अपात्र ठरलेल्या नागरिकांच्या शिधापत्रिका बदलल्या की त्यांना आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनांपासून वंचित रहावे लागणार आहे. कोरोना काळात शुभ्र कार्डधारकांनाही जानेवारीपर्यंत या योजनेत समाविष्ट करण्यात आले होते.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्यावतीने २८ जानेवारीला अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. याअंर्तगत अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात व्याव्यात व त्या प्रमाणात रास्तभाव दुकानांकडील कोटा कमी करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयातून तालुक्यांच्या पातळीवर ही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व तालुक्यातील रेशनदुकानदारांना माहिती भरण्यासाठीचा नमुना अर्ज देण्यात येणार आहे. त्यांनी तो लाभार्थ्यांकडून भरून घ्यायचा आहे. ही माहिती लिपीक, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक यांच्या लॉगीनमधून डाटा एन्ट्रीद्वारे भरली जाणार आहे. लाभार्थ्यांनी भरलेली माहिती, त्यांनी सादर केलेला पुरावा यांची पडताळणी क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. याअंतर्गत एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिलेली नसल्याची खात्री करण्याची महत्त्वाची अट घालण्यात आली आहे.
--
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक
शिधापत्रिकेचा प्रकार : कार्ड संख्या : सदस्य संख्या
अंत्योदय (पिवळे कार्ड) : ५३ हजार २२१ : २ लाख ३८ हजार ३३६
प्राधान्य (केशरी) : ५ लाख १२ हजार १७ : २२ लाख, ८९ हजार ७९८
प्राधान्य नसलेले (केशरी) : २ लाख ७९ हजार ४२६ : ११ लाख ११ हजार ६४
शुभ्र कार्डधारक : ६५ हजार ५८० : २ लाख ३३ हजार ४६१
एकूण : ९ लाख १० हजार २४५ : ३८ लाख ७२ हजार ६६०
---------
हे पुरावे आवश्यक
रहिवासी पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, कार्यालयीन ओळखपत्र, आधारकार्ड.
---
लाखावर उत्पन्न असल्यास शुभ्र कार्ड
ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, खासगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून त्यांना मागणीनुसार शुभ्र शिधापत्रिका दिली जाईल. शुभ्र पत्रिकाधारकांना जनआरोग्य योजनांचा लाभ दिला जात नाही.
-
या कारणाने रद्द होईल शिधापत्रिका
-रहिवासी पुरावा नसल्यास.
-चुकीची माहिती भरलेल्या, संशयास्पद शिधापत्रिका
-विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका
-दुबार, अस्तित्वात नसलेले, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे.
----
शिधापत्रिका शोधमोहिमेअंतर्गत पुरवठा कार्यालयाकडून लाभार्थ्यांना जे अन्न धान्य दिले जाते. त्याची फेरतपासणी केली जाणार आहे. अंत्योदयसह प्राधान्यमधील लाभार्थी खरे आहेत का , त्यांना खरेच अन्नधान्याची गरज आहे का याचा शोध घेतला जाणार आहे. यामुळे निकषानुसार नसललेले कार्ड बदलले जातील व खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत धान्य वितरण करता येणार आहे.
दत्तात्रय कवितके (जिल्हा पुरवठा अधिकारी)
--
आरोग्य विभागातर्फे पिवळे व केशरी कार्डधारकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. कोरोना काळात ही अट बदलून शुभ्र कार्डधारकांनाही या योजनेचा लाभ दिला गेला. ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत होती. लाखावर उत्पन्न असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही, पण सध्या शासनाकडून शुभ्र कार्डधारकांनाही या योजनेत समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू आहे.
सुभाष नांगरे
जिल्हा समन्वयक
महात्मा फुले जनआरोग्य योजना
-