अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:49+5:302021-04-03T04:19:49+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी ...
कोल्हापूर : राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुुरू करण्यात आलेली हो शोधमोहीम थांबविण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर दिले आहेत.
राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे दर महिन्याचे रेशन अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का, तसेच ज्यांची आर्थिक कुवत वार्षिक १ लाखाच्या वर आहे, अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ एप्रिल या कालावधित अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने मागील महिन्यापासून सर्व तालुक्यांना शासनाकडून आलेले छापील अर्ज पाठविण्यात आले आहेत. हे अर्ज रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांकडून भरून घ्यायचे आहेत. सध्या सर्व तालुक्यांमध्ये हे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. मात्र गुरुवारी काढण्यात आलेल्या आदेशात ही मोहीम प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सर्व पुरवठा विभागांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा कार्यालयाने तालुक्यांना अर्ज भरून घेण्याची मोहीम थांबवण्याची सूचना केली आहे.
--